एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी विलास नांदवडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:54 AM2022-09-06T11:54:54+5:302022-09-06T11:55:28+5:30
डॉ. नांदवडेकर यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती.
कोल्हापूर : मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास दत्तू नांदवडेकर यांची नियुक्ती झाली. त्यांचा कालावधी पाच वर्षांचा असणार आहे. त्याबाबतचे पत्र त्यांना या विद्यापीठाकडून सोमवारी मिळाले. मूळ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील असलेल्या डॉ. नांदवडेकर यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती.
डॉ. नांदवडेकर हे पुणे येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालकपदी कार्यरत होते. त्यांची दि. १५ नोव्हेंबर २०१६ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली होती. या पदाचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर ते गेल्या नऊ महिन्यांपूर्वी सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये रूजू झाले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलसचिव नियुक्तीची प्रक्रिया ऑगस्टमध्ये राबविण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाचा सन्मान
मुंबईतील शिक्षण क्षेत्रात ठसा उमटविण्याची संधी शिवाजी विद्यापीठाशी संबंधित असणाऱ्या डॉ. नांदवडेकर यांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा मिळाली. गेल्या महिन्यात डॉ. आर. के. कामत यांची होमी भाभा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली. या नियुक्तीद्वारे शिवाजी विद्यापीठाचा सन्मान झाला आहे.
एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाल्याचा खूप आनंद होत आहे. शिवाजी विद्यापीठ आणि सिंहगड इन्स्टिट्यूटमधील अनुभवाच्या जोरावर एसएनडीटीमध्ये नियुक्ती झाली. या विद्यापीठाच्या विकासाच्या विविध योजना राबविण्याचे ध्येय आहे. -डॉ. विलास नांदवडेकर