कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम समितीने दक्ष राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:22 AM2021-05-15T04:22:07+5:302021-05-15T04:22:07+5:30
सरुड : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावरून युध्दपातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांबरोबरच स्थानिक ग्राम ...
सरुड : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावरून युध्दपातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांबरोबरच स्थानिक ग्राम दक्षता समिती व आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून कोरोना संसर्गाची गंभीर बनत चाललेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशा सूचना जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं. विभाग) अरुण जाधव यांनी सरुड येथील बैठकीत दिल्या.
सरुड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी आदी प्रमुख उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले, वाढता समूह संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी घर टू घर सर्वेक्षण करून कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची माहिती त्वरित आरोग्य यंत्रणेला कळवावी. तसेच त्यांची कोरोना टेस्टही करून घ्यावी. गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढणार नाही यादृष्टीने शासकीय यंत्रणेबरोबरच ग्राम दक्षता समिती व स्थानिक नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
तहसीलदार गुरू बिराजदार म्हणाले, अत्यावश्यक सेवेत येणारे व वैद्यकीय व्यवसाय करणारे सर्व डॉक्टर, औषध दुकानदार, दूध संस्थेतील कर्मचारी यांच्यासह सुपर स्प्रेडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतर व्यावसायिक यांची सर्वप्रथम कोरोना टेस्ट करून घ्या. कोरोना टेस्ट करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची दुकाने, दवाखाने, दूध संस्था व औषध दुकाने सील करण्याचे आदेशही बिराजदार यांनी यावेळी दिले.