गावांचा एल्गार; पंचगंगा प्रदूषण हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:17 AM2018-06-02T00:17:46+5:302018-06-02T00:17:46+5:30
रुकडी, माणगाव : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी शुक्रवारी रुकडी येथे नदीपात्रातच उतरून साखळी उपोषणास सुरुवात केली. रुकडी येथील ग्रामस्थांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. त्यांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन या उपोषणास पाठिंबा दिला.
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समन्वय बैठक बोलवावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी माने यांनी साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी पंचगंगा बचाव कृती समितीची स्थापना केली व हातकणगंले, शिरोळ तालुक्यांतील पंचगंगा प्रदूषणामुळे बाधित गावांतील नागरिकांना साखळी उपोषण करून या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी रुकडी येथील राजेबागस्वार दर्गा येथून पंचगंगा नदीपर्यंत निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीत महिलांसह बालचमू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला. महिला पंचगंगा बचावकरिता विविध फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या.
फेरी नदीकाठावर आली असता नदीपात्रात उतरून उपोषणास सुरुवात झाली. नदीपात्रातच माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर ही फेरी चावडी चौकात आल्यानंतर साखळी उपोषणास सुरुवात झाली.
माजी जि. प. सदस्य बबलू मकानदार, माजी पं. स. सदस्य भगवान जाधव, सरपंच रफीक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, डॉ. विजय पोवार, मुश्ताक पटेल, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुलकर्णी, राजू अपराध, भरत सुतार, विजय पाटील, शिवाजी घोरपडेसह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
निशिंगधाने लक्ष वेधले
येथील तृतीयपंथीय निशिगंधा लोखंडे हिने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, याकरिता आंदोलनात हिरीरिने सहभाग घेतला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, याकरिता विनंती करीत होती. तिचा सहभाग लक्ष वेधून घेत होता.