गावकृती आराखडा पंधरवडा अभियान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:25 AM2021-07-28T04:25:53+5:302021-07-28T04:25:53+5:30
कोल्हापूर - जलजीवन मिशन अंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन आणि युनिसेफ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ...
कोल्हापूर - जलजीवन मिशन अंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन आणि युनिसेफ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे . लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. यासाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हास्तरावरील विविध विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये दि. २८ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. ग्रामस्तरावरील सरपंच,ग्रामसेवक,जलसुरक्षक / पंप ऑपरेटर,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका व ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गाव पातळीवरील गावकृती आराखड्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करुन, संकलित करण्यात येणार आहे.
४ ऑगस्ट रोजी जिल्हा स्तरावर सर्व गावांची कृती आराखड्याची माहिती संकलित करून होऊन आराखडा तयार करण्यात येणार आहे. तर ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत तालुका स्तरावर आराखड्याची पडताळणी होऊन, आवश्यक त्या सुधारणा करून हे आराखडे १५ ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये वाचन व मंजुरीसाठी सादर करावे लागणार आहेत.