उंड्रीतील युवकांच्या एकजुटीने गाव चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:09+5:302021-06-04T04:19:09+5:30
करंजफेण : विक्रम पाटील लाॅकडाऊनमधील सुट्टीचा सदुपयोग म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धर्तीवर उंड्री (ता. पन्हाळा) येथील युवकांनी सलग सहा ...
करंजफेण : विक्रम पाटील
लाॅकडाऊनमधील सुट्टीचा सदुपयोग म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धर्तीवर उंड्री (ता. पन्हाळा) येथील युवकांनी सलग सहा आठवडे स्वच्छता अभियान मोहीम राबविली. स्वच्छता अभियान मोहीम आता पूर्ण झाली आहे. गाव स्वच्छ व समृद्ध ठेवल्यास गावात रोगराईचा फैलाव होणार नाही. या उद्देशाने गावचे युवा सरपंच शहाजी यादव व उपसरपंच शरद मोरे यांनी पुढाकार घेऊन गावातील युवकांना सोबत घेऊन दर रविवारी सुट्टीच्या दिवशी गाव स्वच्छ करण्याचे ठरविले. या उपक्रमामध्ये बघता बघता तीसहून अधिक तरुण सहभागी झाले. त्यानुसार स्वच्छता अभियानास प्रत्यक्ष सुरुवात होऊन गती मिळाली.
प्रथम दर्शनी गावातील संपूर्ण गटारींची स्वच्छता करण्यात आली. यातून जमा झालेला दीडशेहून अधिक ट्राॅली कचरा गावाबाहेर टाकण्यात आला. तसेच गावच्या दुर्लक्षित असलेल्या जुन्या पाणवठ्यावर अनेक वर्षांपासून गुंफून राहिलेली झाडवेली बाजूला काढून जेसीबीच्या साह्याने परिसर सपाटीकरण करून नागरीकांना पाणवठा वापरण्यास मोकळा करूण देण्यात आला. याचबरोबर गावातील गल्लीबोळातील साफसफाई करून स्वच्छता करण्यात आली. कोरोनाच्या धर्तीवर उपाययोजना म्हणून दर आठवड्याला संपूर्ण गावात सॅनिटाझर फवारणी द्वारे गाव निर्जंतुकीकरण करण्यात येत असून ही स्वच्छता मोहीम सलग सहा आठवडे राबविण्यात आल्याने गाव सध्या चकाचक झाले आहे. गाव कोरोनामुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ४५ वयोगटावरील ६० टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले असून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गावातील युवक एकजूटीने राबत आहेत.
चौकट
: महिला सदस्यांचा सहभाग
उंड्री ग्रामपंचायतीवर युवा पॅनेलची सत्ता आहे. त्यामुळे उच्चशिक्षित ग्रा. पं. सदस्या म्हणून कार्यरत असलेली उज्ज्वला कांबळे व सविता व रंजना यादव यांनी टिकाव व खोरे हातात घेऊन युवकांच्या मदतीने गाव स्वच्छता करण्यास सहभाग घेतला.
फोटो : उंड्री (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत व युवकांनी स्वच्छता अभियान राबवून गाव चकाचक केले.