वीज बिल माफीसाठी गावबंदचा धडाका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 04:59 PM2020-11-30T16:59:50+5:302020-11-30T17:01:56+5:30
mahavitran, lightbill, villege, kolhapurnews पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीचा धुरळा सुरू असतानाही वीज बिल माफीसाठी गावागावांमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यास सुरुवात झाली आहे. राज्य इरिगेशन फेडरेशनने केलेल्या आवाहनानुसार गावागावांत बैठका होऊन गावातील व्यवहार बंद ठेवून शासनाला सर्वसामान्यांच्या भावना कळविल्या जात आहेत.
कोल्हापूर : पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीचा धुरळा सुरू असतानाही वीज बिल माफीसाठी गावागावांमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यास सुरुवात झाली आहे. राज्य इरिगेशन फेडरेशनने केलेल्या आवाहनानुसार गावागावांत बैठका होऊन गावातील व्यवहार बंद ठेवून शासनाला सर्वसामान्यांच्या भावना कळविल्या जात आहेत.
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफी व्हावी यासाठी राज्य इरिगेशन फेडरेशनने जिल्हाभर आंदोलनाची हाक दिली आहे. शनिवार (दि.२८) पासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील रोज तीन याप्रमाणे गावे बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले जात आहे.
शनिवारी चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील गावांनी उत्स्फूर्तपणे गावे बंद ठेवली. रविवारीही गावे बंद राहिली. सोमवारी हातकणंगले तालुक्यातील किणी, घुणकी, चावरे ही गावे बंद राहणार आहेत. मंगळवारी करवीर तालुक्यातील महे, कोगे, पाडळी ही गावे बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.
सातत्याने अर्ज विनंत्या मागण्या करूनही शासन वीज बिल माफीचा निर्णय घेत नसल्यानेच जनतेनेच आता निर्णायक लढ्याला सुरुवात केली आहे. इरिगेशन फेडरेशनने म्हणून आम्ही फक्त एकदा आवाहन केले आहे, लोक उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होत आहे, निदान शासनाने आतातरी याची दखल घ्यावी, असे इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी सांगितले.