टिक्केवाडी ग्रामस्थ पंधरा दिवसांनी गावात परतले : गुळ्ळं काढण्याची प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:29 AM2018-03-07T00:29:24+5:302018-03-07T00:29:24+5:30
गारगोटी : टिक्केवाडी (ता. भुदरगड) हे ग्रामस्थ गुळ्ळं काढून मंगळवारी सकाळी परतले. मंगळवारी ग्रामदैवत भुजाईने कौल दिल्याने गुळ्ळं काढून संपल्याने सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी परतले. पंधरा दिवसांच्या वेगळ्या धार्मिक अनुभूतीतून तनामनात आनंद भरून
गारगोटी : टिक्केवाडी (ता. भुदरगड) हे ग्रामस्थ गुळ्ळं काढून मंगळवारी सकाळी परतले. मंगळवारी ग्रामदैवत भुजाईने कौल दिल्याने गुळ्ळं काढून संपल्याने सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी परतले. पंधरा दिवसांच्या वेगळ्या धार्मिक अनुभूतीतून तनामनात आनंद भरून भाविक परतले आहेत. वीस फेब्रुवारी रोजी सर्व ग्रामस्थ गुळ्ळं काढण्यासाठी जंगलात गेले होते. ते मंगळवारी तब्बल पंधरा दिवसांनी परतले.
भुदरगड तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचं टिक्केवाडी गाव आहे. या गावातील ग्रामस्थ दर तीन वर्षांनी गुळ्ळं काढण्याच्या प्रथेप्रमाणे घर-दार सताड उघडे सोडून गावाबाहेर जंगलात राहण्यासाठी जातात. या कालावधीत गावात एकही माणूस नसतो की, गोठ्यात एकही जनावर नसते. कोणत्याच घरात चूल पेटलेली नाही की, दिवा पेटलेला नाही, ही आहे टिक्केवाडी गावची प्रथा. हा संपूर्ण गावच ग्रामदैवत भुजाईदेवीच्या श्रद्धेपोटी जंगलात राहायला जातो. गावकºयांच्या भाषेत 'गुळ्ळं काढायला' अनेक वर्षे गुळ्ळं काढण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जोपासली जात आहे. सुशिक्षितांचं गाव अशी वेगळी ख्याती असलेल्या या गावानं धार्मिक प्रथा तितक्याच श्रद्धेने जोपासलेली आहे. पण पिढ्यान्पिढ्या या गावात 'गुळ्ळं काढणं' ही प्रथा चालत आली आहे. दर तीन वर्षांनी देवीच्या श्रद्धेपोटी ही प्रथा चालत आली आहे.
गुळ्ळं काढण्यापूर्वी ग्रामदैवत भुजाईला कौल लावला जातो. गाव सोडून गावच्या वेशीबाहेर राहायला जावे लागते. देवीने परवानगी दिल्यानंतर सर्व गाव घरात प्रवेश करतो. संसार व घरदार सोडून ग्रामस्थ वेशीबाहेर राहतात. शिवारात पालं, मांडव उभारून संसार थाटतात. निसर्गाच्या सान्निध्यात लहानथोर जीवन व्यतीत करतात. निसर्गात ते वनभोजनाचा आनंद घेतात. काहीजण स्वतंत्र तर काहीजण २० ते २५ कुटुंबे एकत्र येऊन एकच मांडव उभारून राहतात. गावातील स्त्रिया ग्रामीण गीतांमध्ये रंगून जातात. गौरी गीते, जात्यावरच्या ओव्या, रुखवत, उखाणे या ग्रामीण कार्यक्रमांचा रंग भरतो, तर पुरुष मंडळी भजनात रंगून जातात, तर तरुण बुद्धिबळ, कॅरम, मराठी, हिंदी गाण्यांच्या मैफलीत रंगतात. तालुक्यात सुशिक्षितांचा गाव अशी ओळख असताना गावाने प्रथेचा श्रद्धेने स्वीकार केला आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या प्रथेतून त्यांचे भुजाईदेवीवरील प्रेम या निमित्ताने पहावयास मिळते.
टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थ गुळ्ळं काढून मंगळवारी सकाळी गावात पंधरा दिवसानंतर परतले.