पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:24 IST2020-05-30T16:22:28+5:302020-05-30T16:24:34+5:30
गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे गावांनी तालुका आणि तालुक्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे
कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे गावांनी तालुका आणि तालुक्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत संभाव्य पुराच्या अनुषंगाने आराखडे तयार करून यंत्रणा तैनात केली जाते; पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने सर्व यंत्रणेवर ताण आला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी इतर नुकसान मोजण्याच्या पलीकडचे होते. या पार्श्वभूमीवर यंदा अधिक दक्षता बाळगत पूरबाधित गावांना संभाव्य आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या आराखड्यांत गावात किती पाऊस होतो, अतिवृष्टी होणारी ठिकाणे, किती लोक पूरबाधित होऊ शकतात, त्यांच्या स्थलांतराची, निवाऱ्याची काय व्यवस्था असणार, आपत्तीचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची साधनसामग्री उपलब्ध आहे, कोणती आवश्यकता आहे, याची विस्तृत माहिती द्यावी लागणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर गावांनी तालुका तहसीलदारांकडे , तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तो सादर करावयाचा आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क
जिल्हाधिकारी कार्यालयात असलेला आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. आताही ३५ कर्मचाऱ्यांमार्फत तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम चालते; पण १ जूनपासून यात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, महसूल या यंत्रणांतील आणखी १० जण समाविष्ट करून घेतले जाणार आहे. ४५ जणांसह हा कक्ष ऑक्टोबरपर्यंत अहोरात्र सुरू राहणार आहे.
जिल्ह्यातील पूरबाधित गावे
शिरोळ ४२, हातकणंगले २३, करवीर ५७, कागल ४१, राधानगरी २२, गगनबावडा १९, पन्हाळा ४७, शाहूवाडी २५, गडहिंग्लज २७, चंदगड ३०, आजरा ३०, भुदरगड २३
गेल्या वर्षासारखाचा पूर यंदाही येईल, असे गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लागली आहे. जनजागृती व सज्जता तपासण्यासाठी आपत्तीतील बचावाची प्रात्यक्षिकेही घेतली जात आहेत.
प्रसाद संकपाळ,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी