गावकऱ्यांनीच ‘चर्चेतून तोडगा’ काढावा !
By admin | Published: February 20, 2016 12:26 AM2016-02-20T00:26:53+5:302016-02-20T00:43:08+5:30
‘इंचनाळ’ महालक्ष्मी यात्रा : तारखांचा घोळ सुरूच, ‘एकी’ची गरज, सलोखा अबाधित राखावा
राम मगदूम - गडहिंग्लज --इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या पंचवार्षिक यात्रेबाबत दोन मतप्रवाह आहेत. यात्रेच्या तारखांबाबत एकमत न झाल्यामुळेच प्रांताधिकाऱ्यांनी सर्वांच्या सोयीच्या तारखांचा कौल ग्रामस्थांच्या मतदानातून घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मतदानाला विरोध दर्शवितानाच महिलांनी तिसऱ्याच तारखा सुचविल्या आहेत. तारखांचा घोळ सुरूच असल्यामुळे गावातील ‘सलोखा’ आणि ‘बंधूभाव’ अबाधित राहण्यासाठी गावकऱ्यांनीच चर्चेतून तोडगा काढण्याची गरज आहे.‘इंचनाळ’ हे हिरण्यकेशी नदीच्या तीरावर वसलेले गडहिंग्लज तालुक्यातील चारहजार वस्तीचे गाव. चित्री प्रकल्प होण्याआधी वर्षातील सहा महिने हिरण्यकेशी कोरडीच असायची. त्यामुळे गावातील काही मंडळींनी पोटापाण्यासाठी मुंबई गाठली. त्यांची तिसरी पिढीदेखील तिथेच राबते. मात्र, दरवर्षी गणेश जयंतीच्या महाप्रसादासह सणवाराला ते आवर्जून गावी येतात. पुणे-मुंबईतील चाकरमान्यांची संख्या आता सुमारे चारशेच्या घरात आहे.२६ जानेवारीच्या ग्रामसभेत स्थानिक पुढारी मंडळींनी तिथीप्रमाणे मार्चमध्ये यात्रा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नोकरदार मंडळी आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यात्रा मे मध्ये व्हावी, अशी मुंबईकरांची मागणी आहे. मात्र, आठवड्यापूर्वीच्या गावसभेत दोन्ही बाजूची मंडळी आपापल्या मुद्द्यावरच अडून राहिल्यामुळे तोडगा निघाला नाही. दरम्यान, मुंबईकरांनी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यानुसार प्रांतांनी दोन्ही बाजूच्या मंडळींना एकत्र बोलावून चर्चा केली. त्यावेळीही तारखेबाबत एकमत झाले नाही. त्यामुळेच
त्यांनी मतदानाचा सल्ला दिला आहे. मात्र, प्रांतांच्या सल्ल्यालाही महिलांनी हरकत घेतल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील ज्येष्ठ मंडळींनीच पुढाकार घेऊन यात्रेबाबत एकमत घडवावे, अशी ‘इंचनाळ’करांसह पंचक्रोशीतील जनतेची मागणी आहे.
भावनेचा आदर व्हावा
पेशवाईत जीर्णोद्धार झालेल्या प्राचीन गणेश मंदिरामुळे ‘इंचनाळ’ची ख्याती सर्वदूर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासह गावातील सार्वजनिक कामात मुंबईकरांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या भावनेचा आदर व्हावा.
गावातील आबालवृद्धांसह नोकरदार-चाकरमानी मंडळींनाही यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बाजूला ठेवून सर्वांच्या सोयीच्या तारखा ठरवाव्यात.