कोल्हापूर हद्दवाढीला एक इंचही जागा देणार नाही, १९ गावांच्या ग्रामस्थांनी घेतली कठोर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 04:05 PM2024-07-11T16:05:27+5:302024-07-11T16:05:44+5:30
उचगाव : कोल्हापूर हद्दवाढीत गावांना न विचारता पालकमंत्री हद्दवाढ करतातच कशी? शहरांच्या विकासासाठी ४२ गावांसाठी नेमलेल्या प्राधिकरणाने कोणता विकास ...
उचगाव : कोल्हापूर हद्दवाढीत गावांना न विचारता पालकमंत्री हद्दवाढ करतातच कशी? शहरांच्या विकासासाठी ४२ गावांसाठी नेमलेल्या प्राधिकरणाने कोणता विकास केला, आमची गावे सक्षम आहेत. आम्हाला हद्दवाढीची गरज नाही. आमचं ठरलंय, एक इंचही जागा हद्दवाढीसाठी देणार नाही, अशी भूमिका १९ गावांच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. हद्दवाढीला विरोध दर्शवीत या गावांनी येत्या १४ जुलै रोजी गाव बंदची हाक दिली आहे.
उचगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत १९ गावांच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी, महिलांनी हद्दवाढीविरोधात वज्रमूठ करून एल्गार पुकारला आहे. निर्णयप्रक्रियेत मुख्यमंत्र्यांनी १९ गावांच्या रहिवाशांना विचारात न घेता हद्दवाढीची भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही हद्दवाढ होऊ देणार नसल्याची भूमिका यावेळी ग्रामस्थांनी मांडली. हद्दवाढ केली तर नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, असे जाहीर करून ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिका सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीचे कार्याध्यक्ष आणि उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, गडमुडशिंगीचे माजी सरपंच, उपसरपंच तानाजी पाटील यांच्यासह अन्य १९ गावांतील प्रमुख सरपंचांनी हद्दवाढीला विरोध दर्शविला आहे. यावेळी किरण आडसूळ यांनी स्वागत केले.
यावेळी नारायण गाडगीळ (पाचगाव), अमर मोरे (मोरेवाडी), सुमन गुरव (कळंबा), प्रियांका पाटील (पाचगाव), ए. व्ही. कांबळे (मोरेवाडी), राहुल पाटील (कंदलगाव), संदीप पाटोळे (गांधीनगर), चंद्रकांत डावरे (गाेकुळ शिरगाव), शुभांगी आडसूळ (सरनोबतवाडी), अश्विनी शिरगावे (गडमुडशिंगी), भैया इंगवले (वळीवडे), करपे (शिरोली), शीतल मगदूम (शिये), संगीता पाटील (वडणगे), सुनंदा पाटील (आंबेवाडी), रवींद्र पोतदार (नागदेववाडी), मयूर जांभळे (बालिंगा), शुभांगी मिठारी (पीरवाडी), कावजी कदम, शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव, दीपक रेडेकर, अनिल शिंदे, राजेंद्र संकपाळ, तुषार पाटील यांच्यासह २०० ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.