ग्रामस्थांनी मागण्यांचे प्रस्ताव पाठवावेत : ज्ञानेश्वर मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:37+5:302021-09-27T04:25:37+5:30
कुरुंदवाड : बस्तवाड (ता. शिरोळ) गावाला निवृत्त परराष्ट्र सचिव व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांनी भेट देऊन ...
कुरुंदवाड : बस्तवाड (ता. शिरोळ) गावाला निवृत्त परराष्ट्र सचिव व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. महापुराशी सामना करण्यासाठी ग्रामस्थांच्या मागण्यांचे प्रस्ताव शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप चौगुले होते.
२०१९ मध्ये आलेल्या महापुरात बस्तवाड गावचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मुळे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना पुन्हा उभारी देण्यासाठी डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या वतीने गाव दत्तक घेतले होते. यावेळी गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली होती. शिवाय पडझड घरांसाठी बांधकाम साहित्य, शेळीपालन करणाऱ्यांना शेळी, मेंढ्यांचे वाटप करून मदतीचा हात दिला होता. बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी व त्यासाठी पुणे येथे मोफत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केली होती.
ग्रामस्थांच्या अडचणीचा आढावा घेण्यासाठी मुळे यांनी शनिवारी गावाला भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी पूरकाळात सुरक्षित स्थलांतरित करण्यासाठी बस्तवाड, मजरेवाडीदरम्यान ओढ्यावर पूल बांधण्याची, पावसाळ्यात चार महिने स्थलांतरासाठी शासकीय सवलतीमध्ये जागा मिळावी, या प्रमुख मागण्या केल्या. यावेळी मुळे यांनी गावचा मास्टरप्लॅन तयार करण्यात यावा. आपल्या मागण्या शासन दरबारी मांडून त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपसरपंच बाळासाहेब कोळी, इर्शाद पाटील, जे .डी. चव्हाण, जमीर पटेल, अविनाश स्वामी, सुरेंद्र उमराणी, सुदर्शन चौगुले यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
फोटो - २६०९२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - बस्तवाड (ता. शिरोळ) येथे मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांनी भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सरपंच प्रदीप चौगुले, इर्शाद पाटील उपस्थित होते.