महापुरानंतर पुन्हा सावरत आहेत गावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:16+5:302021-07-29T04:25:16+5:30
* सुदैवाने जीवितहानी नाही लोकमत न्यूज नेटवर्क शुभम गायकवाड उदगाव : शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुरामुळे ग्रामीण भागाला मोठा फटका ...
* सुदैवाने जीवितहानी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
शुभम गायकवाड
उदगाव : शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुरामुळे ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. उदगाव, चिंचवाड, कोथळीसह बरीचशी नदीकाठची गावे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करावी लागली. त्यामुळे गाव सोडून शेजारच्या गावात स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांसाठी ग्रामपंचायत, महसूल, आरोग्य, महावितरण, पोलीस प्रशासनाने मोठ्या सचोटीने काम केले. त्यामुळेच या परिसरात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चार दिवसांनी पूर ओसरल्यावर ही गावे पुन्हा सावरताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्व धरणे भरली होती. त्यातून विसर्ग केल्याने तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये महापूर आला होता. त्यामुळे उदगावमधून ४७०, चिंचवाडमधून ४२० तर कोथळीमधून ७४३ कुटुंबांचे जनावरांसह स्थलांतर करण्यात आले होते. पूर ओसरल्यानंतर हे पूरग्रस्त आपापल्या गावात पुन्हा स्थायिक होत आहेत. घरातील प्रापंचिक साहित्याची झालेली दुरवस्था, घरात साठलेला गाळ, कुजलेल्या साहित्याची दुर्गंधी यामुळे घर, गोठा साफ करण्याचे काम त्यांच्याकडून युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन त्यांना मदत करत आहे. आता फक्त शासनाच्या मदतीची अपेक्षा लागली आहे. शासनाने कागदपत्रांची गुंतागुंत न वाढवता मदत करावी, अशी मागणी पूरग्रस्त करत आहेत.
यांनी केली मदत
उदगाव येथील निवारा केंद्रात सात ते आठ गावांतील पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था राजेंद्र पाटील यड्रावकर फाऊंडेशन, उदगाव विकास सोसायटी, उदगाव पाणी पुरवठा, उदगाव बिगरशेती पतसंस्था, ए. पी. पाटील पतसंस्था, कर्मवीर पतसंस्था यांच्यासह दानशूर नागरिकांनी केली. मोफत आरोग्य तपासणी व औषधे मानसमित्र फाऊंडेशनने पुरवली. दुर्गंधी व औषध फवारणीसाठी यड्रावकर फाऊंडेशनने जबाबदारी घेतली आहे.
फोटो ओळ -
१. चिंचवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थांनी घराची साफसफाई केली.
२. उदगाव - चिंचवाड रस्त्यावरील शेतीचे नुकसान झाले आहे.
छाया - अजित चौगुले, उदगाव