गावे बदलली, पण राजकारण नाही
By Admin | Published: December 26, 2016 12:54 AM2016-12-26T00:54:22+5:302016-12-26T00:54:22+5:30
मोहन पाटील : निमशिरगाव येथे २० वे मराठी साहित्य संमेलन ; ग्रंथदिंडी, काव्यमैफील, परिसंवाद उत्साहात
जयसिंगपूर : प्रत्येक साहित्यातून माणसाला वेगवेगळी प्रेरणा मिळते व ही प्रेरणा माणूस जिवंत राहण्यासाठी उपयोगी ठरते. सध्याची व्यवस्था ही कमकुवत बनली असून, यावर लेखकांनी न दबता आवाज उठविला पाहिजे. असत्यपणा पालखीत न बसविता लेखकांनी काय करावे, याचे आचरण केले पाहिजे. तसेच जनतेला काय मिळेल या भावनेचा विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या युगात गावे बदलली आहेत; पण परिवर्तन झाले नाही. त्यामुळे जात, तिढे, राजकारण बदलले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाध्यक्ष प्रा. मोहन पाटील यांनी केले. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे साहित्य सुधा कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंचाच्या वतीने २० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी पार पडले. प्रारंभी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन केले. यावेळी प्रा. पाटील बोलत होते. यावेळी उद्घाटक पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सध्या संमेलनाला देणगी देणारे अनेक आहेत; मात्र श्रोते भेटणे अवघड झाले आहे. गावगाड्यातील शेतकऱ्यांना माझी भाषा तलवारीच्या पात्यागत वाटत असली, तरी ती साहित्यांच्या संस्कारातून घडली आहे. यावेळी स्वागताध्यक्ष ‘शरद’चे संचालक अनिल बागणे होते. स्वागत प्रा. पद्माकर पाटील व प्रास्ताविक शांताराम कांबळे यांनी केले. दरम्यान, जयसिंगपूरच्या नूतन नगराध्यक्षा डॉ. नीता माने व मंत्री खोत यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी मानपत्र वाचन गोमटेश पाटील यांनी केले. समर्पण वाचन नियुक्ती साजणे यांनी केले. यावेळी शेतकरी राजा पुरस्कार चवगोंडा साकाप्पा दानोळे यांना देण्यात आला. साहित्यरत्न पुरस्कार विजय चोरमारे (मुंबई), देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार सुरेश शिपूरकर यांना देण्यात आला. यावेळी डॉ. महावीर अक्कोळे, सुरेश कांबळे, पद्माकर पाटील, रावसाहेब पुजारी, शांतीनाथ पाटील, डॉ. सुकुमार मगदूम, डॉ. श्रीवर्धन पाटील, बी. एल. कांबळे, डॉ. सुभाष अडदंडे, विठ्ठल मोरे, पी. पी. पाटील उपस्थित होते. रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले. आण्णांच्या जीवनपटाचा आढावा घ्या स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कार्य राज्यात उल्लेखनीय आहे. त्यामुळे पुढील साहित्य संमेलनात त्यांच्या जीवनपटाचा आढावा घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन साहित्य संमेलन समितीकडे आमदार उल्हास पाटील यांनी केले. काव्यमैफील दुपारच्या सत्रात आप्पासाहेब खोत-कोडोली यांनी कथाकथन केले, तर ‘काव्यमैफील’ प्रा. डॉ. चंद्रकांत ऊर्फ राजू पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विजय बेळंके, बाळासाहेब बाबर, डी. बी. चिपरगे, अस्मिता इनामदार, डॉ. अनिता खेबुडकर, अभिजित पाटील, रमेश ढाले यांच्यासह कवींनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी) नोटाबंदी मूर्खपणा दुसऱ्या सत्रात ‘नोटाबंदी अर्थकारण की राजकारण’ या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, हे साहित्य संमेलन क्रांतिकारक आहे. सध्या नोटाबंदीमुळे देशात अर्थव्यवस्था गंभीर बनली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेविना शासनाने हे धोरण राबविल्यामुळे नोटाबंदीचा निर्णय मूर्खपणाचा आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘चिदंबरम्’ यांच्या बातमीचा आढावा वारंवार आपल्या मार्गदर्शनात त्यांनी केला.