Kolhapur: गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावेच ठरेनात, शास्त्रशुद्ध तपासणी नसल्याने प्रस्ताव नाकारुन परत
By समीर देशपांडे | Published: June 19, 2024 01:21 PM2024-06-19T13:21:58+5:302024-06-19T13:22:37+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावे किती आहेत हेच जिल्हा परिषदेला ठरवता आलेले नाही. ...
समीर देशपांडे
कोल्हापूर : गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावे किती आहेत हेच जिल्हा परिषदेला ठरवता आलेले नाही. मग उपाययोजना कशी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अव्वाच्या सव्वा गावांची संख्या घालून प्रस्ताव पाठवले गेले आणि ते नाकारून परत आले. नेमक्या किती गावांमुळे प्रदूषण होते याची शास्त्रशुद्ध तपासणी करून मगच निधीची मागणी करण्याची गरज असताना अधिकारी बैठकीत ठरल्याप्रमाणे नुसते प्रस्तावावर प्रस्ताव पाठवत सुटले आहेत.
पंचगंगा नदीकाठच्या ३९ गावांमधून विनाप्रक्रिया सांडपाणी नदीत मिसळते आणि त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढते, असे सांगण्यात येते. परंतु, जिल्हा परिषदेकडून याआधी गावांची संख्या वेगवेगळी सांगितली गेल्याने यामध्ये घोळच होत गेला आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या तुलनेत ग्रामीण भागातून कमी सांडपाणी मिसळले जात असताना बोट मात्र या गावांकडे दाखवण्यात येते आणि अधिकारीही गावांची संख्याही बदलून सांगत असल्याने गैरसमजाला बळ मिळाले आहे.
तुळशी, कुंभी, कासारी, भोगावती या चार प्रत्यक्षातील आणि दिसून येत नसलेली सरस्वती या नद्यांची मिळून पंचगंगा बनल्याचे मानले जाते. त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणाचे सर्वेक्षण करताना वरील चारही नद्यांच्या काठच्या गावांचेही सर्वेक्षण करण्यात आले. अशा १७१ गावांपैकी ८९ गावांचे सांडपाणी त्या त्या नदीत मिसळते, असे मानले गेले आणि यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांसाठी शासनाकडे २५२ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. २१ फेब्रुवारी आणि २३ ऑक्टोबर २०२३ असे दोन वेळा हे प्रस्ताव केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडे आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठवण्यात आले. परंतु, सहा महिन्यांपूर्वी हा प्रस्तावच फेटाळण्यात आला आहे.
त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर सांडपाणी निर्माण करून नदीत सोडणारी १५ गावे निवडण्यात आली असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी १०० कोटी रुपयांची मागणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव मंजूर झाला तर मग पावसाळ्यानंतर या कामांना सुरुवात होऊन पुढील वर्षी कामकाज सुरू होऊन २०२६ मध्ये पंचगंगेत सांडपाणी मिसळणे बंद होऊ शकते. परंतु, त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
पंचगंगेचे प्रदूषण करणारी मुख्य गावे
पुलाची शिराेली, चंदूर, कबनूर, कोरोची, मोरेवाडी, गांधीनगर, उचगाव, गडमुडशिंगी, कळंबे तर्फ ठाणे, पाचगाव, नृसिंहवाडी, तळंदगे, रूकडी, वसगडे, रूई. या गावांमध्ये सर्वाधिक सात गावे ही हातकणंगले तालुक्यातील आहेत. सहा गावे करवीर तालुक्यातील असून, एक गाव शिराेळ तालुक्यातील आहे.
प्रदूषणास जबाबदार तालुकानिहाय गावे
- करवीर ४२
- राधानगरी १७
- हातकणंगले १४
- पन्हाळा ०६
- शिरोळ ०५
- गगनबावडा ०४
- शाहूवाडी ०१