कोल्हापूरच्या दिव्यांग विनम्रने पूर्ण केली ९९९९ पायऱ्यांची गिरनार यात्रा, महिनाभर केला खडतर सराव
By संदीप आडनाईक | Published: July 25, 2022 12:57 PM2022-07-25T12:57:03+5:302022-07-25T12:59:11+5:30
गिरनार पर्वताची यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणारा विनम्र हा स्पेशल चाईल्ड गटातील पहिलाच
संदीप आडनाईक
कोल्हापूर : गुजरात राज्यातील जुनागड (सौराष्ट्र)जिल्ह्यातील ९९९९ पायऱ्या असलेल्या गिरनार पर्वताची यात्रा कोल्हापूरच्या दिव्यांग तरुणाने पूर्ण केली आहे. शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारी ही यात्रा पूर्ण करणाऱ्या या विनम्र अनिल खटावकरचे कोल्हापुरात विशेष कौतुक होत आहे. वैशिष्ट्य म्हणजे गिरनार पर्वताची यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणारा विनम्र हा स्पेशल चाईल्ड गटातील पहिलाच आहे.
हिमालयापेक्षाही जुना पर्वत समूह असलेल्या (रेवतक पर्वत) या गिरनार पर्वतावर श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवासस्थान आहे असे मानले जाते. श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान असलेल्या या पर्वतशिखरांच्या समूहाला श्रीगिरनार म्हणतात.
कोल्हापुरातील जोतिबा परफेक्ट अँड सेफ ग्रुप (जे -पास ग्रुप) या ट्रेकिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ७१ स्त्री-पुरुष ट्रेकर्ससोबत शेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिराचा विद्यार्थी, बौद्धिक अक्षम असलेल्या २५ वर्षीय विनम्र अनिल खटावकरने आईसोबत ही यात्रा १८ जुलै २०२२ रोजी यशस्वीपणे पूर्ण केली. श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे, तसेच् हजारो वर्षांपासून श्री दत्त महाराजांनी प्रज्वलित केलेल्या अग्नीचेही (दत्त अग्नी) त्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतले.
महिनाभर खडतर सराव
ही यात्रा पूर्ण करण्यासाठी विनम्र व त्याची आई विजया यांनी प्रशिक्षक अविनाश हावळ यांच्यासोबत रोज ३००० पायऱ्या चढण्याचा महिनाभर खडतर असा सराव केला. यापूर्वी विनम्रने कळसूबाई शिखर, हरिश्चंद्र गड, रांगणा किल्ला, पन्हाळा ते पावनखिंड असे ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. आता तो अमरनाथ आणि चारधाम यात्रा पूर्ण करणार आहे.
केवळ चार तासांत यात्रा पूर्ण
विनम्रने ही यात्रा चार तासांत पूर्ण केली. पहाटे ३ वाजून ८ मिनिटांनी चढाईस सुरुवात केली आणि ते ७ वाजून १५ मिनिटांनी पर्वतावर पोहोचले. ११.१५ वाजता परतीचा प्रवास सुरू केला, नंतर आरामात चार वाजता खाली पोहोचले.
विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांसोबत पालकांनीही प्रयत्न केले पाहिजेत. विनम्रच्या आई-वडिलांनी जे प्रयत्न केले त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. चेतनाचे नाव उंचाविल्याबद्दल विनम्रचे विशेष अभिनंदन. -पवन खेबुडकर, कार्यकारी अध्यक्ष, चेतना अपंगमती विकास संस्था.