वर्षभर विनासुट्टी.. मल्लिनाथ कलशेट्टी ! राज्यभर ‘स्वच्छतादूत’ म्हणून परिचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:23 AM2020-02-23T01:23:22+5:302020-02-23T01:26:13+5:30
विशेष म्हणजे ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यांवर, नाल्यांमध्ये स्वच्छतेसाठी उतरतात. पंचायत राजमध्ये तयार झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकासाचा गाडा हाकण्यात त्यांचा हातखंडा आहे.
विनोद सावंत ।
कोल्हापूर : नोकरदार असो, अधिकारी असो अथवा व्यापारी असो; आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी ठरलेलीच असते. या दिवशी विश्रांतीबरोबर कुटुंबासाठी वेळ दिला जातो. भारतीय प्रशासन सेवेत असणारे कोल्हापूरचेआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी मात्र याला अपवाद आहेत. वर्षभरात त्यांनी एका दिवशीही सुट्टी घेतलेली नाही. कोल्हापूरला प्रथमच असे आयुक्त लाभले आहेत. कोल्हापूर महापालिकेत त्यांना रुजू होऊन वर्ष होत आले आहे.
शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी कामाचा ताण पडत असल्यामुळे राज्य सरकाराने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला असताना हे असे अधिकारी आहेत की त्यांना आठवडाही पुरत नाही. कोल्हापूर महापालिकेत रुजू झाल्यापासून त्यांनी एकाही दिवशी सुट्टी घेतलेली नाही.
विशेष म्हणजे आजपर्यंतच्या सेवेत त्यांनी एकदाही वैद्यकीय रजा घेतलेली नसून ते अखंडपणे काम करीत आहेत. शहर स्वच्छ करण्याबरोबरच कोल्हापूर हे राज्यातील पहिले प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा त्यांचा निर्धार आहे. दर रविवारी ते ‘स्वच्छता अभियान’ राबवितात. गेल्या वर्षभरापासून त्यांनी अखंड ४३ रविवार स्वच्छता मोहीम राबविली.
विशेष म्हणजे ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यांवर, नाल्यांमध्ये स्वच्छतेसाठी उतरतात. पंचायत राजमध्ये तयार झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकासाचा गाडा हाकण्यात त्यांचा हातखंडा आहे. स्वच्छता मोहीम, महापुरामध्ये लोकांच्या मदतीला धावून जाण्यात त्यांनी उल्लेखनीय काम केले.
सांगली पॅटर्न राज्यभर
डॉ. कलशेट्टी सांगलीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी ‘संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान’ प्रभावीपणे राबविले. राज्य शासनाने त्याची दखल घेतली. ‘सांगली पॅटर्न’ राज्यभर राबविण्यासाठी या अभियानांतर्गत त्यांच्यासाठी ‘राज्य समन्वयक’ हे नवीन पद तयार केले.
डॉ. कलशेट्टी यांचे उल्लेखनीय काम
- - सरदार सरोवर बाधितांचे पुनर्वसन
- - बालमृत्यू प्रमाण कमी करण्यात यश
- -जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पाणी फौंडेशनचे काम
- आदिवासींसाठी तयार केलेल्या नियमांचा ‘पेसा कायद्या’मध्ये समावेश.
एक दिवसही ‘ब्रेक’ नाही
प्रशासकीय सेवेत असणाऱ्यांना बदलीच्या काळात नऊ दिवस सुट्टी घेण्याची मुभा असते. डॉ. कलशेट्टी हे एक दिवसही विश्रांती न घेता दुसºयाच दिवशी नवीन जागेवर रुजू झाले.
बदलीवेळी एक दिवसही सुट्टी न घेणारे अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. मुंबई, पुणे येथे कामानिमित्त गेल्यानंतर रात्री उशिरा कोल्हापुरात आल्यानंतरही सकाळी उठून ते कामावर हजर असतात.
कोल्हापूर महापालिकेला मी आई मानून काम करतो. त्यामुळेच सुट्टी दिवशीही सेवा बजावतो. शिवाजी विद्यापीठातील सेवा योजनेत घडलो असल्यामुळे माझे स्वच्छतेला नेहमी प्राधान्य असते. आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केले असून, पुढेही असेच काम करीत राहणार आहे. पुढील काळात महापालिकेच्या शाळा दर्जेदार करण्याचे लक्ष्य आहे.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महापालिका