विनय काेरेही विरोधी छावणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:22 AM2021-03-22T04:22:45+5:302021-03-22T04:22:45+5:30
(विनय कोरे, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांचे फोटो वापरावेत) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या रणांगणात माजी आमदार सत्यजित ...
(विनय कोरे, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांचे फोटो वापरावेत)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या रणांगणात माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यानंतर आता आमदार विनय कोरेही विरोधी छावणीत दाखल झाले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत रविवारी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. कोरे गटाला किती जागा द्यायच्या याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम निर्णय येत्या आठवड्यात घेतला जाणार आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात तगडे पॅनेल करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी कंबर कसली आहे. सत्तारूढ गटाला हादरे देण्याची एकही संधी सोडत नाहीत. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह सहा संचालकांना आपल्याकडे वळविले. विशेष म्हणजे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर हे आपल्यासोबतच राहतील, अशी अटकळ सत्तारूढ गटाच्या नेत्यांना होती. मात्र, राज्यातील आकारास आलेली महाविकास आघाडी आणि शिवसेना नेत्यांचा एकसंध राहण्याच्या दबावामुळे त्यांनी विरोधी आघाडीसोबत राहण्याची भूमिका घेतली. आमदार विनय कोरे हे राज्यात भाजपसोबत आहेत, त्यामुळे ते सत्तारूढ आघाडीसोबत राहणार, अशीच अटकळ होती. मात्र, रविवारी मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील, के. पी. पाटील व विनय कोरे यांची तासभर शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यामध्ये कोरे गटाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा झाली.
कोट-
‘गोकुळ’च्या राजकारणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरे गटाला किती जागा द्यायच्या यावर बैठकीत चर्चा झाली.
- आमदार विनय कोरे