विनय कोरे हे शांतीतून क्रांती करणारे नेतृत्व - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:30 PM2024-09-03T13:30:54+5:302024-09-03T13:31:32+5:30
एकमेकांवर स्तुतिसुमने
कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार विनय कोरे यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. भाजप आणि जनसुराज्य पक्षाचे परस्पर संबंध किती घनिष्ट आहेत हेच यावरून स्पष्ट झाले. दुपारी ३:५३ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम ४ वाजून ४८ मिनिटांनी संपला. राष्ट्रपती येण्याआधी सात मिनिटे राज्यपालांसह सर्व मान्यवर आधी व्यासपीठावर येऊन बसले होते.
फडणवीस म्हणाले, आमचे मित्र विनय कोरे हे शांतीतून क्रांती घडवणारे असे व्यक्तिमत्त्व आहे. राजकारण करतानाही सामाजिक परिवर्तन झाले पाहिजे हाच त्यांचा नेहमी विचार असतो. प्रास्ताविकात कोरे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. ते म्हणाले, फडणवीस यांच्यामुळेच आज राष्ट्रपतींचा सन्मान करण्याची संधी आम्हा वारणावासीयांना मिळाली आहे. यावेळी कोरे यांनी या कार्यक्रमादिवशी वारणा विद्यापीठाचे उद्घघाटन करण्यासाठी मंत्री चंद्रकात पाटील यांनी जातीने लक्ष घालून कमी कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून ही परवानगी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आम्ही एकत्रच
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव घेताना कोरे यांनी आपला दोस्ताना यावेळी जाहीर केला. फडणवीस यांना उद्देशून ते म्हणाले, आम्ही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, दूध संघ अन्य सहकाराच्या राजकारणात गेली अनेक वर्षे एकत्र आहोत. पक्षीय राजकारणात जरी वेगळे होतो तरीही आता तुमच्यामुळे राज्य पातळीवरही एकत्र येण्याची संधी आम्हाला मिळाली.
वारणा परिवाराकडून नेटके नियोजन
राष्ट्रपतींच्या या कार्यक्रमाचे वारणा परिवाराकडून नेटके नियोजन करण्यात आले. आधी दोन तास आळंदी येथील कीर्तनकार ज्ञानेश्वर वाबळे, शाहीर डॉ. देवानंद माळी यांचा कार्यक्रम झाला. दुपारी २ पर्यंत चारही सभामंडप भरून गेले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. विविध ठिकाणी पार्किंग केल्याने ती अडचण आली नाही. तरीही प्रचंड गर्दी झाल्याने अनेक महिलांना बाहेर थांबावे लागले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजन ठेवण्यात आले होते.