विधानसभेला विनय कोरेंची महायुतीतून राज्यात १२ हून अधिक जागांची मागणी
By समीर देशपांडे | Published: July 4, 2024 11:42 AM2024-07-04T11:42:29+5:302024-07-04T11:43:49+5:30
जनसुराज्यच्या या मागणीला महायुतीचे नेते कसे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे
कोल्हापूर : जनुसराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात १२ ते १५ जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. महायुतीच्या नेत्यांकडे ही मागणी ते करणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील १० पैकी चार जागा मिळाव्यात अशीही त्यांची मागणी आहे. जनसुराज्यच्या या मागणीला महायुतीचे नेते कसे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जनसुराज्य पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे चार आमदार निवडून आले होते. परंतू नंतर ही संख्या कमी झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात तत्कालिन सरकारला पाठिंबा देणाऱ्या कोरे यांनी त्यावेळी अपारंपरिक उर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्रीपदही मिळवले होते. मात्र २०१४ नंतर ते महायुतीसोबत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या वारणा साखर कारखान्याला केंद्र शासनाने ३५० कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केले आहे.
दरम्यान, कोरे यांनी कोल्हापूरसह काही महापालिकांच्या निवडणुकाही लढवल्या होत्या. लिंगायत मतदारांच्या पट्ट्यात त्यांनी पहिल्या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते स्वत पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघातून उभे केलेले अशोकराव माने यांचा थोडक्यात पराभव झाला होता. मात्र त्यावेळच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्यच्या उमेदवारामुळे भाजपच्या शिवाजी पाटील यांचा थोडक्यात पराभव झाला होता.