राज्यसेवा मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात प्रथम, कोणताही क्लास न लावता मिळवले यश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:41 AM2024-01-19T11:41:19+5:302024-01-19T11:44:58+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात मुदाळ ...
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात मुदाळ (ता. भुदरगड) येथील विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. भोसले हा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय गटातील (ईडब्ल्यूएस) आहे. आई-वडील दोघेही शेतकरी, कोणतेही क्लास न लावता कोल्हापुरातील खासगी अभ्यासिकेत अभ्यास करत विनायकने हे यश मिळवले.
विनायकचे बारावीपर्यंतचे शिक्षण मुदाळमधील प. बा. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्याने बी.एस्सी. केल्यानंतर त्याने कोल्हापुरात येत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सायबर चौकातील खासगी अभ्यासिकेत अभ्यास करून दुसऱ्याच प्रयत्नात त्याने हे घवघवीत यश मिळवले. दरम्यान, विनायक पाटील याने सहा महिन्यांपूर्वी विक्रीकर अधिकारी व उपशिक्षणाधिकारी परीक्षेतही यश मिळवले होते.
आमच्या कष्टाची उतराई केली, वडिलांचा आनंद गगनात मावेना
मुलाने महाराष्ट्रात प्रथम येत आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या कष्टाची उतराई केल्याची भावना विनायकचे वडील नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केली. नंदकुमार पाटील यांना अवघी दोन एकर जमीन. पाटील दाम्पत्याची शेतीवरच गुजराण. मात्र, मुलाने मिळवलेले यश पाहून आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरून गेला.
या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलो यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. यशात आई-वडिलांचे कष्ट मोठे आहेत. -विनायक पाटील,
गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची
उमेदवारांकडून पसंतीक्रम मागविण्यात येत आहेत. त्यासाठी उमेदवारांना २२ ते २९ जानेवारीदरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम भरून द्यायचे आहेत. उमेदवारांची त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार पदांवर निवड करण्यात येईल. ही गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर गुणवत्ताक्रमात बदल होऊ शकतो, असेही आयोगाने कळविले आहे.