विनोद तावडे मोठे होतील, आम्हांला आनंद आहे; मंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचक प्रतिक्रिया
By समीर देशपांडे | Published: June 11, 2024 12:36 PM2024-06-11T12:36:09+5:302024-06-11T12:38:38+5:30
'कांदा आणि मराठा आरक्षण याबाबत आम्ही जे काही केलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो'
कोल्हापूर : विनोद तावडे हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे जातील तेथे यश मिळवण्यासाठी सर्व बारकावे पाहतात. ते मोठे होतील आणि त्याचा आम्हांला आनंद आहे. पक्ष चालवण्यामागे त्यांची मोठी भूमिका आहे असे सूचक वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पाटील यांच्या हस्ते मंगळवारी शेंडा पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र त्यांना काय द्यायचे हे ठरवेल. याबाबत अनेक पर्याय चर्चेत येत आहेत असेही ते म्हणाले.
विविध प्रश्नांना उत्तर देताना पाटील म्हणाले, मोहन भागवत हे सर्वांचे पालक आहेत. घरामध्ये काहीही घडलं तर त्याच्यावर बोलण्याचा त्यांचा अधिकारच असतो. आम्ही नेहमीच आत्मपरीक्षण करतोच. त्यामुळे दोन जागांवरून आम्ही इथंपर्यंत आलो आहोत. पुणे लोकसभा क्षेत्रात उत्तम समूहकाम झालं आहे. आम्ही तेथे संविधान यात्राही काढली होती. मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना वस्तुस्थिती सांगावी लागणार आहे. कांदा आणि मराठा आरक्षण याबाबत आम्ही जे काही केलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो. अमित शहा यांच्या सुचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा कामाला सुरूवात केली आहे.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत आणि कागलच्या मतांबाबत हसन मुश्रीफ, संजय मंडलिक आणि समरजित घाटगे यांनी एकत्र बसून चर्चा करावी. दक्षिण आणि उत्तरमध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही यातील दुरूस्त्या करू.