आरोग्य राज्यमंत्र्यांनाच राहिले नाही कोविड नियमांचे भान, काढली विजयी जंगी मिरवणूक; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 11:57 AM2022-01-10T11:57:02+5:302022-01-10T15:42:51+5:30
वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच या नियमाचे पालन करत नसल्याचे समोर येत आहे.
जयसिंगपूर : जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयसिंगपूर येथे मिरवणूक काढून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह दहा जणां विरुध्द जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी (दि. ७) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासह त्यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकर, राहूल बंडगर, रोहित पाथरवट, विनायक गायकवाड, तेजस उपाध्ये अभिनंदन देमापूरे, अक्षय परुळेकर, शुभम ऐतवडे व धीरज पाराज यांच्यासह ४०० ते ५०० कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत क्रांती चौक येथे जेसीबीने गुलालाची उधळण केली. तसेच कोविड नियमांचे उल्लंघन केले. याबाबतची तक्रार पोलीस कर्मचारी विजय पाटील यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शिरोळ तालुका विकास संस्था गटातून विजयी झाले. या विजयानंतर त्यांनी जिल्हा बँकेवरील आपले पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द केले आहे. यड्रावकर यांना ९८ मते मिळाली. या गटातून त्यांनी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचा पराभव केला आहे.