Kolhapur: ॲड. गिरीश नाईक यांच्यासह २० जणांवर बंदी आदेश उल्लंघनाचा गुन्हा
By उद्धव गोडसे | Published: June 6, 2024 02:26 PM2024-06-06T14:26:12+5:302024-06-06T14:27:03+5:30
पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विनापरवानगी गर्दी, गुंड अजय शिंदे खुनाचा वाद धुमसतोय
कोल्हापूर : गुंड अजय दगडू शिंदे याचा रंकाळा चौपाटीवर खून झाल्यानंतर यादवनगरात दोन गटात वाद धुमसत आहे. मंगळवारी (दि. ४) रात्री तिघांनी डवरी वसाहतीत काही घरांमध्ये घुसून दहशत माजवल्यानंतर बुधवारी (दि. ५) दुपारी २० ते २५ जण पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहोचले. मात्र, बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी ॲड. गिरीश नाईक यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल केला.
घरात घुसून संसारोपयोगी साहित्याची तोडफोड करत दहशत माजवल्याबद्दल शेवंता मोहन जगताप (वय ५०, रा. डवरी वसाहत, यादवनगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित हल्लेखोर आकाश संजय माळी, सुरेश संजय माळी आणि अनिकेत शामराव जगताप (तिघे रा. यादवनगर) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तिघांनी फिर्यादी शेवंता जगताप यांच्यासह रेश्मा देवेंद्र शिंदे आणि अर्जुन यशवंत शिंदे यांच्याही घरात घुसून साहित्याची तोडफोड करीत दहशत माजवली.
या प्रकारानंतर बुधवारी २० ते २५ जणांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवेदन दिले. दहशत माजवणा-या संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, बंदी आदेश असताना विनापरवानगी गर्दी जमवल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुंड अजय शिंदे याच्या खुनानंतर यादवनगरातील दोन्ही गटातील वाद धुमसत आहे. यातून काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
ॲड. गिरीश नाईक (रा. कोल्हापूर), जनाबाई निवृत्ती माळी, शेवंता मोहन जगताप, वैजयंती श्रीकांत माळी, लक्ष्मी दशरथ शिंदे, निशा अर्जुन शिंदे, शालन मुनार जगताप, अंजना निवृत्ती माळी, भारती विलास शिंदे, रेश्मा देवेंद्र शिंदे, रेश्मा दीपक जगताप, इश्वर उत्तम माळी, आकाश दशरथ शिंदे, देवेंद्र दशरथ शिंदे, अर्जुन यशवंत शिंदे, संभाजी महादेव शिंदे, श्रीकांत निवृत्ती माळी, मोहन सादू जगताप, करण सुदाम शिंदे आणि दीपक मनोहर जगताप (सर्व रा. यादवनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.