करिअर रखडले; उत्सवात विघ्न, कोल्हापुरात ९६१ जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:22 PM2023-09-08T12:22:52+5:302023-09-08T12:24:37+5:30
क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले
उद्धव गोडसे
कोल्हापूर : गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतलेल्या ९६१ जणांवर पोलिसांनी गेल्या पाच वर्षात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण १४९ गुन्ह्यांपैकी १७ गुन्ह्यांचा निकाल लागला असून, ११३ खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू आहे. क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले आहे, तर अनेकांना पासपोर्ट मिळण्यात ही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तरुणांचे करिअर पणाला लावायचे का? याचा मंडळांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
उत्सव उत्साहात साजरे व्हायला पाहिजेत, यात दुमत नाहीच. पण, उत्साहाच्या भरात काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होते. विना परवानगी मंडप उभारणे, डीजे लावून आवाजाचा दणदणाट करणे, मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर लावून वाहतुकीला अडथळा करणे, मिरवणूक मार्गात मुद्दाम थांबून इतर मंडळांची अडवणूक करणे, मारामारी करणे, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार मंडळांकडून होतात. याचा त्रास अन्य मंडळांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागिरकांना सहन करावा लागतो.
त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. गेल्या पाच वर्षात पोलिसांनी जिल्ह्यात असे १४९ गुन्हे दाखल करून ९६१ जणांवर कारवाई केली. त्यापैकी १७ गुन्ह्यांचा न्यायालयात निकाल लागला असून, ११३ खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.
तरुणांच्या करिअरला धोका
गुन्हे दाखल झालेल्या संशयितांमध्ये बहुतांश तरुण आहेत. पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या चारित्र्य पडताळणी दाखल्यात गुन्ह्यांची नोंद होणार आहे. यामुळे उत्सवांमध्ये अतिउत्साह दाखवणाऱ्या तरुणांचे करिअर धोक्यात आले आहे. गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
भाग पाच आणि सहाचे गुन्हे
भाग पाच आणि सहा म्हणजे मारामारी, मिरवणुकीत गोंधळ घालणे, पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे ८९ गुन्हे दाखल झाले असून, त्या अंतर्गत ६७३ जणांवर कारवाई सुरू आहे.
ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे
गुन्हे - ४१
आरोपी - २३१
अदखलपात्र गुन्हे
गुन्हे - १९
आरोपी - ५७
उत्सव काळात नकळतपणे तरुणांकडून काही गुन्हे घडतात. काही ठिकाणी तरुण जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतात. गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे तरुणांनी अशा घटनांपासून दूर राहावे. - महेंद्र पंडित - पोलिस अधीक्षक