वाहतूक नियमांचे उल्लंघन, होईल लायसन्सचे निलंबन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:00+5:302021-09-16T04:30:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडाचा फटका बसतोच;पण किरकोळ दंड भरून सुटका करता येते, अशा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडाचा फटका बसतोच;पण किरकोळ दंड भरून सुटका करता येते, अशा भ्रमात असाल तर सावधान...! कारण वारंवार अशापध्दतीने सुटका करणाऱ्यांचे लायसन्स रद्द होऊ शकते. गेल्या साडेचार वर्षांत तब्बल ५८ जणांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लायसन्स निलंबित करून झटका दिला आहे. याशिवाय अनेकांचे प्रस्ताव आरटीओ कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे दंड भरल्यानंतर सुटका करता येते, हा भ्रम प्रत्येक वाहनचालकाने काढून टाकला पाहिजे.
परिवहन कार्यालयाने रस्त्यावर वाहन चालविणाऱ्यांसाठी नियमावली ठरवून दिलेली आहे. आजची तरुण पिढी या नियमांचा अनेकवेळा भंग करताना दिसून येत आहे. वाहन चालविणाऱ्यांबरोबरच समोरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठीच हे नियम आहेत. अनेक वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यात निष्पाप व्यक्तींचा बळी गेल्याच्या तसेच दुखापतीच्याही घटना आहेत. अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलीस व आरटीओ कार्यालयामार्फत कडक शासन केले जाते. वाहतुकीचे वारंवार नियम तोडणाऱ्यांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा प्रस्ताव हा वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत पाठवला जातो. त्यावर आरटीओ अधिकारी अंतिम निर्णय घेतात.
वर्ष : लायसन्स निलंबन संख्या
२०१८ : १६
२०१९ : २०
२०२० : ०८
२०२१ (ऑगस्टपर्यंत) : १४
हे नियम मोडल्यास लायसन्स निलंबन
- अतिवेग : वाहनात क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसवून त्यांच्या अगर समोरुन येणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्यास तसेच अतिवेगाने वाहन चालवल्यास.
- मद्यप्राशन : अंमली पदार्थांसह मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास.
- सिग्नल जंपिंग : सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास.
- मोबाईलवर बोलत वाहन चालवणे : मोबाईलवर बोलत असतानाच वाहन चालविणे हा गुन्हा आहे.
- प्रवासी वाहतूक : मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करत असल्यास.
आधी तीन महिने नंतर कायमचे...
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा प्रस्ताव हा वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आरटीओ कार्यालयास पाठवला जातो, पण वारंवार नियम जाणूनबुजून तोडत असल्यास त्याचे लायसन्स कायमचे रद्द करण्याचा अधिकार हा आरटीओ कार्यालयास आहे.
अशी होते कारवाई...
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यास प्रत्येकवेळी दंडात्मक कारवाई होते. त्यानंतर दंड भरून वाहन सोडले जाते; पण नंतर वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आरटीओला पाठवला जातो. त्यानंतरच त्या वाहनधारकाचे लायसन्स निलंबन करण्यावर शिक्कामोर्तब केले जाते.
कोट..
वाहतुकीचे नियम हे स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किरकोळ दंड भरून सुटका करून घेण्याची चूक कधीतरी कोणाच्यातरी जिवावर बेतण्याची शक्यता असते. प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. - स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर शहर