येवती ग्रामस्थांकडून उल्लंघन, गावात काढली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:55+5:302021-04-24T04:25:55+5:30
दिंडनेर्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. असे ...
दिंडनेर्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. असे असताना येवती (करवीर) येथील ग्रामस्थांनी लॉकडाऊनचा फज्जा उडवीत वाजतगाजत मिरवणूक काढत विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. याप्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह सर्व सदस्य, अशा वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना संचारबंदीची तमा न बाळगता येवती ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत गावातील मंदिरात विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यावेळी गावातील गल्लीमधून रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या टाकून गावातून हरिनामाच्या गजर करीत सवाद्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये महिला, लहान मुली, शाळकरी मुले व वृद्ध, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील लोक हजर होते. मूर्ती प्रतिष्ठापना, मूर्तीस अभिषेक व इतर धार्मिक विधी, असा हा कार्यक्रम झाला.
याप्रकरणी सरपंच वीरधवल किरणसिंह पाटील, उपसरपंच संतोष केरबा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मिलनसिंह पाटील, वर्षा विक्रम पाटील, धनाजी विठ्ठल पाटील, माधुरी शरद आळवेकर, साधना निवास सुतार, संग्राम कुंडलिक गुरव, धनाजी विठ्ठल पाटील, दीपाली कैलास शेळके यासह मिलनसिंह पाटील, मल्हार पाटील, गौतम पाटील, बाळासाहेब पाटील, सुहास पाटील, शंकर गुरव, अनिल नाळे, रंगराव पाटील, बाबूराव पाटील, विष्णू पाटील, प्रदीप पाटील आदींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.पी. जरग यांनी दिली असून, अधिक तपास इस्पुर्ली पोलीस करीत आहेत.
कोरोना ग्राम दक्षता समितीच नॉटरिचेबल :
या घटनेची माहिती घेण्यासाठी सरपंच वीरधवल किरणसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही, तसेच ग्रामसेवकांचाही फोन बंद होता. पोलीस पाटलांनाही याबाबत काही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट :
लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कोल्हापूर गारगोटी रोडवर इस्पुर्ली हद्दीमध्ये अनेक ठिकाणी तपासणी करतात. गावोगावी पाहणी करतात; पण पोलीस स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या एवढ्या मोठ्या नियोजित कार्यक्रमाची माहिती त्यांना कशी नव्हती. त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते का, असे प्रश्न पोलिसांच्या भूमिकेवरून उपस्थित होत आहेत.