नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर सीसीटीव्हीची नजर हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:08+5:302021-02-07T04:22:08+5:30
कोल्हापूर : रुक्मिणी नगर ते निरामय रुग्णालय या एकेरी मार्गावर उलट दिशेने येऊन वाहतूक कोंडीसह नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ...
कोल्हापूर : रुक्मिणी नगर ते निरामय रुग्णालय या एकेरी मार्गावर उलट दिशेने येऊन वाहतूक कोंडीसह नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने शनिवारपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, पोलीस कर्मचारी तेथून गेल्यानंतर वाहनचालक पुन्हा ये-जा करत आहेत. त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील ज्येष्ठांकडून होत आहे.
रुक्मिणी नगर वाहतूक कोंडीबाबत ‘लोकमत’मधून शनिवारी वृत्त प्रसि्द्ध झाले. त्यानंतर शहर वाहतूक शाखेने उलट दिशेने येणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. दिवसभरात अनेक वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र, कारवाईनंतर पोलीस अन्यत्र गेले की, पुन्हा वाहनचालक उलट दिशेने येऊन वाहतूक नियमांचा भंग करत आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी ही नेहमीचीच बाब ठरली आहे. अशा वाहनचालकांचे प्रबोधन करणे अथवा कायमस्वरूपी या मार्गावरून उलट दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे थेट कारवाई करणे गरजेचे आहे. तरच येथून उलट दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना जरब बसेल. यासोबतच रस्ता एकदिशा मार्ग केल्यामुळे येथील व्यावसायिकांचा व्यवसाय कमी झाला आहे. याविरोधात व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेची बाब बनली आहे.