चंद्रकांत पाटील यांच्या ‘ईडी’ चौकशीच्या व्हिडीओने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 02:13 PM2019-08-26T14:13:36+5:302019-08-26T14:16:15+5:30
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमाप संपत्ती गोळा केली असून त्यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, या मागणीचा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कोल्हापूर शहरात एकच खळबळ माजली; पण या व्हिडीओचे खंडन करीत हा खोडसाळपणा असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले; तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली.
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमाप संपत्ती गोळा केली असून त्यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, या मागणीचा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कोल्हापूर शहरात एकच खळबळ माजली; पण या व्हिडीओचे खंडन करीत हा खोडसाळपणा असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले; तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली.
राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असली तरी कोल्हापूर शहरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहिल्या. त्यातूनच गेल्या वर्षी आमदार क्षीरसागर यांनी पालकमंत्र्यांवर बोचरी टीका करीत, मंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीत अमाप वाढ झाली असून देवस्थानच्या जमिनीतून त्यांनी मोठी संपत्ती गोळा केली.
त्याची ‘ईडी’मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे क्षीरसागर यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यानंतर या दोन नेत्यांतील वाद टोकाला गेला होता; पण लोकसभा निवडणुकीवेळी युती झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला.
अचानकच क्षीरसागर यांचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ माजली. भाजपचे राहुल चिकोडे यांनी राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, मंत्री चंंद्रकांत पाटील व आपल्यात कोणीतरी वितुष्ट निर्माण करण्याचा खोडसाळपणा करीत आहे. केंद्रानंतर आता राज्यातही युतीची सत्ता येणार असल्याने काहीजणांनी जाणीवपूर्वक चुकीचे जुना व्हिडीओ व्हायरल केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
सोशल मीडियामार्फत पालकमंत्री पाटील यांच्याबद्दल चुकीचा जुना व्हिडिओ व्हायरल करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल केला, त्यांच्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे चिकोडे यांनी पत्रकात म्हटले आहे.
पोलिसांकडून चौकशी
व्हिडीओ कोणी व्हायरल केला, त्याची पोलिसांनी रविवारी संबंधितांकडे चौकशी केली. आमच्याकडे आलेला व्हिडिओ तो पुढे पाठविल्याची माहिती संबंधितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.