हाणामारी, दगडफेक, हुल्लडबाजीने यळगूडच्या यात्रेस गालबोट

By Admin | Published: April 26, 2016 08:41 PM2016-04-26T20:41:32+5:302016-04-27T00:58:19+5:30

पोलिसांची गांधारीची भूमिका : गावच्या शांतताप्रिय कला, क्रीडा, सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरलेला तडा

Violence, ruckus and vandalism in the Yalagud yatra | हाणामारी, दगडफेक, हुल्लडबाजीने यळगूडच्या यात्रेस गालबोट

हाणामारी, दगडफेक, हुल्लडबाजीने यळगूडच्या यात्रेस गालबोट

googlenewsNext

तानाजी घोरपडे -- हुपरी -यळगूड (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या यात्रा कालावधीत यात्रा समिती व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये निर्माण झालेले वितुष्ठ, स्थानिक लोकप्रतिनिधींचे मानापमान नाट्य, विघ्नसंतोशी तरुणांच्यामध्ये उफाळून आलेला वाद, कुस्ती मैदानामध्ये सलग दोनवेळा मार खाऊनही तिसरी कुस्ती खेळण्याचा एका पैलवानाचा अट्टहास, सांस्कृतिक (तमाशा) कार्यक्रमावेळी झालेली हाणामारी, दगडफेक व हुल्लडबाजीमुळे गावच्या शांतताप्रिय कला, क्रीडा, सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरलेला गालबोट लागले आहे. हा सर्व प्रकार हुपरी पोलिसांच्या उपस्थितीत घडूनही पोलिसांनी गांधारीच्या भूमिकेतच राहणे पसंत केले.
यामध्ये संपूर्ण तरुण वर्ग कुणाच्या ना कुणाच्या तरी दवणीला बांधला जाऊन आपल्या भविष्याचा व आपल्यावरती अवलंबून असणाऱ्या कुटुंबापासून दुरावत चालला आहे. समजुतीच्या गोष्टी सांगून मनपरिवर्तन करणाऱ्याला खुळ््यात काढून तरुण वर्ग मनमानेल तसे वागत आहे.
ग्रामदैवत श्री हनुमान देवाची यात्रा २१ ते २४ एप्रिल या कालावधीत साजरी करण्यात आली. यात्रेचे नियोजन करण्यासाठी गुढीपाडव्या दिवसी बोलाविण्यात आलेल्या बैठकीपासूनच वादविवाद, भांडणे मानापान नाट्यास सुरुवात झाली होती. गेल्या तीन ते चार वर्षांपासून यात्रा समितीची जबाबदारी हिंदू संघटना पार पाडत आहे. मात्र, यावेळी राजकीय सत्ता संघर्षातून दुसरा गट ही यात्रा समिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. यातूनच खऱ्या अर्थाने वादाची ठिणगी पडली. सांस्कृतिक कार्यक्रमावेळी अनेक अडथळे आणून संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी तरुणांकडून सातत्याने सुरू होता. मैदानामध्ये तालमीचे कधीतरीच तोंड पाहत असलेल्या पैलवानाने कुस्ती करण्याचा प्रयत्न केला. पाहिली कुस्ती मार खाल्ली, दुसरी कुस्तीही सपाटून मार खाल्ली, तरीही त्याने तिसरी कुस्ती खेळण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यावर संयोजकांनी आक्षेप घेत नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या पैलवानाने विनाकारण कुरापती काढण्यास सुरुवात केली. रात्री तमाशा कार्यक्रमावेळी मोटारसायकल रेस करून त्रास देण्यास सुरुवात केली. यातूनच हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत तो पैलवान जखमी झाला. त्यानंतर एका तरुणाने तमाशातील नर्तकीचा मोबाईलवरती फोटो काढण्याचा प्रयत्न चालविला. त्यामुळे पुन्हा वादविवाद, भांडणे शिवीगाळ, दगडफेकीचा प्रकार घडल्यामुळे तमाशा उधळला गेला, असे सर्व प्रकार हुपरी पोलिसांच्या उपस्थितीत सरू होते. मात्र, पोलिसांनी केवळ गांधारीची भूमिका पार पाडत असल्याचे चिंताजनक चित्र संपूर्ण गावाने अनुभवले आहे.

Web Title: Violence, ruckus and vandalism in the Yalagud yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.