कोल्हापुरातील विविध प्रश्नी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने
By संदीप आडनाईक | Published: June 27, 2024 06:20 PM2024-06-27T18:20:12+5:302024-06-27T18:20:40+5:30
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवकांनी नागरिकांसह महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने केली. ‘कधी देता पाणी, डोळ्या आले पाणी’, ‘पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ, नियोजनात मोठा घोळ’, ‘कचरा उठाव गडबडला, गावभर कचरा पसरला’, ‘नगररचना खाते करतं काय, सामान्यांच्या कामात आडवा पाय’ अशा विविध घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले.
कोल्हापूर महापालिकेत साडेतीन वर्षापासून सुरु असलेल्या प्रशासकीय कामकाजादरम्यान, विविध नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत प्रशासनाला जाग आणण्यासाठी नागरिकांनी शेकडो तक्रारी सोबत घेत महापालिकेसमोर सकाळी ११ वाजता जोरदार निदर्शने केली. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, डॉ.अश्विनी माळकर, प्रा. नीलिमा व्हटकर, जयंत गोयाणी, प्रताप देसाई यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.
माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे आणि प्रदीप उलपे यांनी ११ जून रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तर त्याआधीच्या आठवड्यात मुक्त संवाद आयोजित करुन नागरिकांच्या तक्रारी तसेच कोल्हापूरच्या विकासासंबंधीच्या संकल्पना एकत्रित केल्या होत्या.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी झालेल्या चर्चेत माजी नगरसेवक किरण नकाते, रश्मी साळोखे, सविता साळोखे, प्रकाश घाटगे, ओंकार गोसावी, अमेय भालकर, सुनील पाटील यांनी वेगवेगळ्या विभागाविषयींच्या तक्रारींची माहिती दिली, तसेच या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक विभागासोबत स्वतंत्र बैठक घेण्याची, तसेच बैठकीनंतर त्याच आठवड्यात प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी आंदोलकांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित विभागासोबत स्वतंत्र बैठका बोलावू असे सांगितले.
या आंदोलनात प्रसाद पाटोळे, बापू राणे, सविता सोलापूरे, मनोज प्रसादे, नितीन वणकुद्रे, सुमंत जाधव, साजिद आत्तार, मिलिंद टोपले, मिथुन मगदूम, नीरज कुंभोजकर, गणेश राणे, कैलास पाटील, उमेश कांबळे, संग्राम पाटील, मानसिंग पवार, सतीश सुतार, संग्राम लोहार, रणजित सुतार, अभिजित सुर्यवंशी, अतुल शिंदे सहभागी झाले.