विठ्ठल भक्तांचा महापूर प्रतिपंढरपूर
By admin | Published: July 15, 2016 11:45 PM2016-07-15T23:45:15+5:302016-07-16T00:02:47+5:30
नंदवाळ : लाखो भाविकांची उपस्थिती
कोल्हापूर : डोईवर तुळशी वृंदावन, संत ज्ञानेश्वर-तुकारामांचे शिल्प, हाती टाळ... त्यास मृदंगाची साथ, मुखी हरिनामाचा अखंड जयघोष करीत सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वैष्णवांच्या संगे फुलांनी सजलेला रथ, पालखी अशा लवाजम्यानिशी शुक्रवारी कोल्हापूर-नंदवाळ दिंडी मोठ्या उत्साहात झाली. या दिंडीत जिल्ह्यातील हजारो भाविकांनी सहभाग घेतला. श्री ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळाच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून कोल्हापूर-नंदवाळ पायी दिंडीचे आयोजन केले जाते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक धुमाळ यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती झाली. त्यानंतर चांदीच्या पादुका आणि पालखीपूजन पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळासाहेब पोवार, दिंडीप्रमुख भगवान तिवले, आनंदराव लाड महाराज, नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, दीपक गौड, बापू चव्हाण, दुर्वास कदम, एम. पी. पाटील, आदी उपस्थित होते. या सोहळ्यानंतर विणेकरी, टाळकरी, मानाचे अश्व, मानदंड धरणारे मानकरी आणि विठ्ठलनामाचा गजर करणारे वारकरी अशी पायी दिंडी सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्धरीतीने भजन, कीर्तन करीत दिंडी बिनखांबी गणेश मंदिर येथून मार्गस्थ झाली. ही दिंडी निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, खंडोबा तालीम, जुना वाशी नाका, सानेगुरुजी वसाहतीमार्गे पुईखडी येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या पटांगणात आली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दिंडीतील महत्त्वाचा मोठा रिंगण सोहळा झाला. या सोहळ्याचे पूजन महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी पताका, प्रथम टाळ, मृदंग, विणकरी, अश्व असे रिंगण झाले. या रिंगण सोहळ्यानंतर पालखीने नंदवाळकडे प्रस्थान केले. श्री लक्ष्मीनारायण जनसेवा रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्रातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. २०० पोलिसांचा बंदोबस्त दिंडी मार्गावर शहर वाहतूक शाखा व करवीर पोलिस ठाणे यांच्यामार्फत विविध ठिकाणी २०० पोलिसांनी वाहतूक नियंत्रण व चोख बंदोबस्त ठेवला. नंदवाळमध्ये दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत रीघ