कुडाळला मराठा बांधवांचा बैलगाडीसह विराट मोर्चा -मिरज-भिगवण मार्गावर निषेध सभा अन् मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:57 AM2018-08-10T00:57:44+5:302018-08-10T00:58:50+5:30
जावळी तालुक्यातील विशेषत: कुडाळ, सायगाव, बामणोली, शेते, म्हसवे, सरताळे, हुमगाव, करहर विभागातील मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बैलगाडींचा विराट मोर्चा काढला.
सायगाव : जावळी तालुक्यातील विशेषत: कुडाळ, सायगाव, बामणोली, शेते, म्हसवे, सरताळे, हुमगाव, करहर विभागातील मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बैलगाडींचा विराट मोर्चा काढला. कुडाळ, ता. जावळी येथील मुख्य छत्रपती संभाजी महाराज चौकात रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत रोषही व्यक्त केला. तर संपूर्ण दिवसभर सायगावसह-कुडाळ बाजारपेठेत उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा आंदोलकांनी सकाळी अकरा वाजता कुडाळ गावातून बैलगाडीत बसून भव्य रॅली काढून मुख्य चौकात रास्ता रोको व ठिय्या आंदोलन केले, त्यानंतर मेढा येथे जाण्यासाठी मार्गक्रमण केले. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
कृष्णा पात्रात धगधगता हुंकार
वाई : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता वाई तालुक्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव वाईमध्ये एकत्र आले. शहरातून दुचाकींची रॅली काढून घोषणा देण्यात आल्या. हा भव्य मोर्चा शिवाजी चौकापर्यंत काढून ठिय्या मांडण्यात आला. तसेच कृष्णा नदीपात्रात उतरुन आंदोलन केले.
शिवाजी चौकातून मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅलीचा प्रारंभ केला़ महारॅली शिवाजी चौकातून वाई बसस्थानक, सिद्धनाथवाडी, महागणपती पुलावरून शाहीरचौक, गंगापुरी, भाजी मंडई वाई नगरपालिका, बावधन नाक्यावरून प्रांत कार्यालयासमोर पोहोचली. या ठिकाणी प्रातांधिकारी अस्मिता मोरे यांना निवेदन देऊन शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले. यावेळी जम्मू काश्मीर येथे शहीद झालेले वीर मेजर कौस्तुभ राणे व मराठा आंदोलनात राज्यभरातून आरक्षण व इतर मागण्यांसाठी बलिदान दिलेल्या २६ मराठा बांधवांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली़ समाजातील युवक, महिला यांनी बावधन नाका चौकात भर रस्त्यात ठिय्या मांडून आंदोलनाची धार तीव्र केली़ यावेळी अनेकांनी विचार प्रकट करून गोंधळ घालण्यात आला़ आंदोलनस्थळी आमदार मकरंद पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. अकरा वाजता सुरू झालेल्या आंदोलनाची तीनला सांगता झाली.
नऊ गावांत रास्ता रोको..
वाई तालुक्यातील सर्व गावांतून शंभर टक्के बंद पाळून गावांमधून मराठा अंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी गावांच्या वेशीवर ग्रामस्थांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. त्यानंतर वाईमधील महारॅलीमध्ये सहभागी झाले. यामध्ये मांढरदेव, बावधन, ओझर्डे, पसरणी, मेणवली, धोम, शेंदूरजणे, कवठे, केंजळ येथे रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
मिरज-भिगवण मार्गावर निषेध सभा अन् मोर्चा
मायणी : येथील मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गावरील चांदणी चौकामध्ये सभा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
मराठा समाजामार्फत गुरुवारी मायणी, कलेढोण व विखळे येथे विविध मागण्यांसाठी मोर्चे काढण्यात आले. तसेच सकाळी सकल मराठा समाजाकडून संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला व्यापारांनीही पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली आहेत. तसेच सकाळी दहा वाजल्यापासून येथील चांदणी चौकामध्ये सकल मराठा समाजबांधव एकत्र येऊ लागले. साडेदहा वाजता एकत्र आलेल्या समाजबांधवांकडून शहरातील मराठी शाळा, बसस्थानक, चावडी चौक, उभी पेठ, नवी पेठ यासह शहरातून मोर्चा काढण्यात आला.
तसेच मिरज-भिगवण व मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील चांदणी चौकामध्ये शासनाच्या निषेधार्थ निषेध सभा घेऊन सभेमध्ये आरक्षणाची मागणी केली. दरम्यान, येथील कलेढोण व विखळे गावांमध्ये सकल मराठा समाजामार्फत बंद पुकारण्यात आला. मायणीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्याकडे मराठा समाजाकडून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.