वीरेंद्र तावडेला २१ ला न्यायालयात हजर करा
By admin | Published: January 4, 2017 12:24 AM2017-01-04T00:24:12+5:302017-01-04T00:24:12+5:30
न्यायालयाची सूचना : विनय पवार, सारंग अकोलकर यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला २१ जानेवारीला कोल्हापुरातील न्यायालयात हजर करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिले. त्याचबरोबर या हत्येतील तिसरा संशयित आरोपी सातारा जिल्ह्यातील विनय पवार (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) व चौथा संशयित सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) या दोघांच्या अटकेची प्रक्रिया पोलिसांनी सुरू करावी, अशा सूचना बिलेही यांनी दिल्या. त्यामुळे समीर गायकवाड व तावडेची एकत्रित सुनावणी या दिवशी एकत्रित होणार आहे.
मंगळवारी गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड व वीरेंद्रसिंह तावडे याच्या हजर अर्जावर बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पानसरे हत्या प्रकरणातील तावडे याच्यावर डिसेंबर २०१६ ला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्या तावडे हा पुण्यातील येरवडा कारागृहात आहे. तावडेचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी तावडेला दोषारोपपत्रातील माहिती सांगायची आहे, तसेच हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग करायचा आहे. त्यामुळे तावडेला न्यायालयात हजर करावे, असा अर्ज दिला होता. या अर्जावर मंगळवारी बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी बिले यांनी, तावडेला २१ जानेवारीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी, पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज) व सारंग दिलीप अकोलकर (रा.चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) अद्याप फरारी आहेत, असा युक्तिवाद केला. त्यावर या दोघांना पकडण्याचा अधिकार तपास यंत्रणेचा आहे.
पवार व अकोलकर यांच्या अटकेची पोलिसांनी प्रक्रिया करावी, तसेच या दोघांची माहिती असलेले पत्रक शासकीय कार्यालय, शहरातील भित्तीपत्रकावर त्यांची माहिती लावावी तसेच वर्तमानपत्रांतही (वाँटेड) त्यांची माहिती द्यावयाचा अधिकार हा तपास यंत्रणेचा असल्याचे बिले यांनी सांगितले. दरम्यान, पानसरे खटल्यात आता अॅड. शिवाजीराव राणे हे काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)
दोघेही पसार...
संशयित विनय पवार व सारंग अकोलकर हे दोघेजण २००९ पासून पसार आहेत. ते अद्याप मिळून आलेले नाहीत. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हे दोघे संशयित आरोपी आहेत. त्यामुळे पोलिस या प्रकरणात दोघांचा शोध घेत आहेत.
चार्जफ्रेमवर सुनावणी...
समीर गायकवाड याच्यावर डिसेंबर २०१५ ला न्यायालयात दोषारोपपत्र (चार्टशीट) दाखल झाले आहे; पण, अद्यापही दोषारोपपत्र निश्चित झालेले नाही. उच्च न्यायालयाने चार्र्जफ्रेम सुनावणी लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे न्यायालयाने २१ जानेवारीला चार्जफ्रेमवर ही सुनावणी होणार असल्याचे सांगितले.
साप्ताहिक सनातन प्रभात मिळावे : समीर गायकवाड
समीर गायकवाड हा मंगळवारी बिले यांच्या न्यायालयात हजर होता. त्यावेळी समीर गायकवाडचे वकील अॅड. पटवर्धन यांनी, साप्ताहिक सनातन प्रभात मिळावे, अशी त्याची मागणी असल्याचे यावेळी सांगितले.