कौमार्य चाचणी, शारीरिक छळप्रकरणी पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:28+5:302021-04-11T04:24:28+5:30
कोल्हापूर : कौमार्य चाचणीत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहिणींना तोंडी घटस्फोट देऊन विवाहानंतर तिसऱ्या दिवशी कोल्हापूरला माहेरी पाठविल्याप्रकरणी राजारामपुरी ...
कोल्हापूर : कौमार्य चाचणीत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहिणींना तोंडी घटस्फोट देऊन विवाहानंतर तिसऱ्या दिवशी कोल्हापूरला माहेरी पाठविल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पती संदीप सनी कांजारभाट-गागडे (वय २५, रा. हनुमाननगर, बेळगाव, रा. कर्नाटक) याला अटक केली, तर त्याचा दुसऱ्या मुलीचा पती सुरजित कांजारभाट-गागडेसह सात जण अद्याप पसार आहेत, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कोल्हापुरात राहणाऱ्या कंजारभाट समाजातील एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह बेळगाव (कर्नाटक) येथील हनुमाननगरातील संदीप व सुरजित गागडे या भावांसोबत दि. २७ नोव्हेंबर २०२० ला झाला होता. त्यानंतर त्या दोन्हीही बहिणींची कोमार्य चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये एक मुलगी अपयशी ठरली. घटनेनंतर संबंधित दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या लोकांकडून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले, तसेच दोघींना घरातून हाकलून कोल्हापुरात माहेरी पाठविले. समाजातील जात पंचायतीनेही त्यांच्या नात्याचा काडीमोड केला.
दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या मदतीने त्यांनी गुरुवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री पती संदीप कांजारभाट-गागडे याला अटक केली. त्याशिवाय दुसऱ्या मुलीचा पती सुरजित गागडे, त्याची आई, एक नातेवाईक व जात पंचायतचे चौघे, असे गुन्हा दाखल झालेले सात जण अद्याप पसार आहेत.