परमेश्वराची गुणात्मक भक्ती हीच श्रेष्ठ
By admin | Published: May 10, 2017 12:42 AM2017-05-10T00:42:01+5:302017-05-10T00:42:01+5:30
स्वानंद पुंड : महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे व्याख्यानमाला
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोणत्याही देवतेची उपासना करणे म्हणजे केवळ त्याचे नामस्मरण करणे नाही; तर त्या देवतेची गुणवैशिष्ट्ये आत्मसात करणे होय. परमेश्वराची गुणात्मक भक्ती हीच श्रेष्ठ असल्याचे मत वणी येथील प्रा. स्वानंद पुंड यांनी मंगळवारी कोल्हापुरात व्यक्त केले.
ते श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘समर्थ रामदासांची गणेशवंदना’ या विषयावरील व्याख्यानमालेत बोलत होते. ताराबाई रोडवरील महालक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे हे व्याख्यान झाले.
यावेळी पुंड म्हणाले, पुराणकथा या रूपकात्मक असतात, त्याचा अर्थ आपण समजून घेणे आवश्यक आहे. भगवान गणेश किंवा कोणतीही देवता निर्गुण-निराकार रूपात असते. देवतांवर आधारित पुराणकथा या प्रतीकात्मक आहेत. त्यांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. संतसाहित्य चिरकाल टिकण्याचे कारण त्यातील गुणात्मक अर्थ आहे, असे सांगून गजाननाची गुणात्मक भक्ती कशी करावी, यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले. अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राजाभाऊ जोशी, माजी महापौर शिरीष कणेरकर, नानासो नष्टे, वैभव मेवेकरी, वसंतराव पोवार, किरण धर्माधिकारी, गजानन नार्वेकर, दिनेश माळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संचालक नंदकुमार मराठे यांनी आभार मानले.
आजचे व्याख्यान
वक्ते : अभिजित कुलकर्णी, सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी संघ, शहर कार्यकारिणी कोल्हापूर
विषय : देशापुढील आव्हाने आणि संधी
वेळ : सायंकाळी सहा वाजता.
कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत मंगळवारी पहिल्या दिवशी प्रा. स्वानंद पुंड यांनी
‘श्री समर्थ रामदासांची गणेशवंदना’ यावर मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून नंदकुमार मराठे, राजू मेवेकरी उपस्थित होते.