राधानगरी, वारणा धरणांतून विसर्ग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 06:10 PM2020-08-21T18:10:09+5:302020-08-21T18:23:39+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाल्याने राधानगरी व वारणा धरणांतून सायंकाळी विसर्ग वाढविण्यात आला.
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाल्याने राधानगरी व वारणा धरणांतून सायंकाळी विसर्ग वाढविण्यात आला. सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २५.०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पंचगंगेची पातळी ३६.१० फुटांपर्यंत आली आहे.
शुक्रवारी सकाळपासून गगनबावडा, आजरा, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत पावसाची रिपरिप राहिली. करवीर, कागल, कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात एक-दोन सरी वगळता उघडीप होती. गगनबावड्यासह धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे ३,५ व ६ क्रमांकाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले सायंकाळी झाल्याने एकूण विसर्ग ५६८४ क्युसेकने विसर्ग वाढला आहे.
सध्या त्यातून प्रतिसेकंद ५६८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून जवळपासून दुप्पट विसर्ग केला असून ११ हजार ९७८ घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. दूधगंगेतून मात्र १८०० घनफुटांचा विसर्ग सुरू आहे.
पावसाची उघडझाप असल्याने नद्यांची पाणीपातळी संथगतीने उतरू लागली आहे. पंचगंगेची पातळी शुक्रवारी सकाळी ३८.३ फूट होती, ती सायंकाळी सात वाजता ३६.७ फुटांपर्यंत खाली आली होती. अद्याप ३३ बंधारे पाण्याखाली असून या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे.
चार राज्य व १६ प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे ठप्प आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ९७ मिलिमीटर झाला; तर १४ खासगी मालमत्तांची पडझड होऊन तीन लाख सात हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये-
राधानगरी (८.३५), तुळशी (३.३५), वारणा (३१.९९), दूधगंगा (२३.६६), कासारी (२.४७), कडवी (२.५२), कुंभी (२.५०), पाटगाव (३.७२).
धरणामधून सुरू विसर्ग
तुळशी- २५२ क्युसेक, वारणा- ११९७८ क्युसेक, दुधगंगा- १८०० क्युसेक, कासारी- २५० क्युसेक, कडवी - ८६५ क्युसेक,
कुंभी - ३५० क्युसेक, पाटगाव - २८१८ क्युसेक, चित्री - ११७३ क्युसेक, जंगमहट्टि- ३३५ क्युसेक, घटप्रभा -१६७३ क्युसेक, जांबरे-११९८ क्युसेक, कोदे- ६६३ क्युसेक
बंधारा पाणी पातळी
राजाराम- ३६ फूट १०, राजापूर - ४७ फुट ६, नृसिंहवाडी -५९ फुट ६, शिरोळ - ५९ फुट ६, इचलकरंजी -६५ फुट ९ इंच, तेरवाड - ५९ फुट ३ इंच,
कोयना पाणी पातळी- ६५६.६४१ मी, सध्या ९३.४५ टीएमसी (८८. ७९ टक्के) जावक विसर्ग २५०००
अलमट्टि पाणी पातळी सध्या ५१८.१२ मी, ९१.४६४ टीएमसी आवक २७४०२८ व जावक विसर्ग २५१९२२