Kolhapur- विशाळगड जाळपोळ प्रकरण: श्रद्धेवर घाव, गजापूरवासीयांची मने घायाळ
By विश्वास पाटील | Published: July 17, 2024 12:44 PM2024-07-17T12:44:37+5:302024-07-17T12:46:18+5:30
संभाजीराजेंना नुसता हात वर केला असता तर..
विश्वास पाटील/सचिन पाटील
गजापूर (ता. शाहूवाडी) : मोडलेली घरे, डोळ्यादेखत झालेले वाहनांचे नुकसान, उघड्यावर आलेले संसार, प्रार्थनास्थळाची तोडफोड झाल्याने श्रद्धेवर बसलेला वर्मी घाव याबद्दलच्या संतप्त भावनांचा कल्लोळ मंगळवारी उफाळून आला. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आम्हाला पोटाशी धरले, जमिनी दिल्या, त्यांच्या वारसाने जमाव गोळा करावा आणि आमचा काहीच दोष नसताना, भीतीने गप्प घरात बसलो असताना आमचे जगणेच उद्ध्वस्त करावे याबद्दलचा उद्वेग मुस्लीम समाजाने व्यक्त केला. निमित्त होते खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीचे.. या भेटीदरम्यान स्वत: खासदार शाहू छत्रपतीही लोकांच्या भावना ऐकून काही क्षण गलबलून गेले.
रविवारी दुपारी जे अनुभवले ते सांगताना महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. आमची घरेदारे फोडली, गाड्या फोडल्या, ती नव्याने उभी करू, परंतु मंदिर, मशिदीसह गिरिजा घराची तोडफोड करू नका.. त्यातून मनाला होणारी जखम लवकर भरून येत नाही. कोल्हापूरची हिंदू-मुस्लीम बंधुभावाची राजर्षी शाहूंनी घट्ट केलेली सामाजिक वीण तुटू देऊ नका.. अशीच भावनाही या समाजाने व्यक्त केली.
विशाळगडावरील अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण लागले. त्यामध्ये गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये मुस्लीम समाजाच्या घरांची तोडफोड करण्यात आली. या लोकांना धीर देण्यासाठी आणि घडलेली नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने हा दौरा केला. परंतु, ही तोडफोड होईपर्यंत बघ्याची भूमिका घेणारे प्रशासन किती कर्तव्यतत्पर आहे याचा अनुभव पांढरेपाणी येथूनच आला. सुमारे तासभर पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर मग त्यांनी फक्त गजापूरपर्यंतच जाण्यास परवानगी दिली. दोनच्या सुमारास गावात पोहोचलो. जिथे मुस्लीम समाजाची घरे सुरू होतात, तिथूनच तोडफोड सुरू झाल्याचे दिसत होते. दारांत सगळीकडे काचा फोडलेल्या, टायर फुटलेल्या गाड्या, मोडलेली घरे, प्रापंचिक साहित्याची नासधूस, गॅस सिलिंडरपासून पाण्याच्या बाटल्याही फेकून दिलेल्या असे दृश्य सगळीकडे दिसले.
आमचा गडावरील अतिक्रमणे काढण्यास कोणताच विरोध नव्हता. पोलिसांनी आम्हाला तुम्ही शांतपणे घरी बसा, अशा सूचना केल्या होत्या. तसे असताना अचानक ११ च्या सुमारास पाच-सहाशे जणांचा जमाव आला. तो पहिल्यांदा प्रार्थनास्थळात घुसला. त्याची तोडफोड केली. त्यांच्या हातात तलवारी होत्या, हातोडे होते. लोखंडी बार होते. त्यांनी जे दिसेल ते फोडले, गाड्या उलट्या करून टाकल्या. प्रार्थनास्थळातील साहित्याला आग लावली. आम्ही बायका-पोरांना घेऊन घरदार सोडून जंगलात पळालो, म्हणून वाचलो. ती आमची घरे फोडायला नव्हे तर आमच्यावर हल्ले करायला आले होते. म्हणून आम्ही जीव वाचवण्यासाठी पळून गेलो.
आंदोलन होणार म्हणून आम्हाला आधार कार्ड बघितल्याशिवाय पोलिस गावात सोडत नव्हते आणि हा एवढा जमाव मग कसा आला..? पोलिसांना आधी सांगूनही पुरेसा बंदोबस्त त्यांनी ठेवला नाही.. तोडफोड सुरू झाल्यावर त्यांना रोखण्यासाठी एकही पोलिस नव्हता.. हा हल्ला अचानक झालेला नव्हता.. तो पूर्वनियोजितच होता..ग्रामस्थ भडाभडा संताप व्यक्त करत होते.. दोन दिवसांपासून घुसमटलेला श्वास मोकळा करत होते..आपले अश्रू पुसण्यासाठी स्वत: शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे लोक आलेत ही भावना त्यांना धीर देत होती.. आमचा काहीच दोष नसताना विशिष्ट समाजाचे आहे म्हणून आमची घरेदारे उद्ध्वस्त झाली, मने रक्तबंबाळ झाली, ही वेदनेची सल मात्र प्रत्येकाला टोचत होती.. त्यावर सद्भावनेची फुंकर घालण्याव्यतिरिक्त कोणच काही करू शकत नव्हते..
संभाजीराजेंना नुसता हात वर केला असता तर..
गजापूरमधील घरांची तोडफोड सुरू होती तेव्हा संभाजीराजे गावात होते. त्यांनी नुसता हात वर केला असता तरी आम्हाला हात लावण्याची कुणाची हिंमत झाली नसती, परंतु त्यांनी हा शिवप्रेमींचा आक्रोश आहे म्हणत तसे केले नाही.. राजेसाहेबांनी हे योग्य केले नाही, असे सांगताना ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले.
जुजबी पोलिस..
विशाळगडावर जाताना रस्त्याला लागूनच प्रार्थनास्थळ आहे. रविवारी मोहीम होती म्हटल्यावर पुरेसा बंदोबस्त ठेवायला हवा होता. शाहूवाडी पोलिसांनी १० अधिक १५ अशा तुकड्यांचा बंदोबस्त लावतो असे सांगितले होते, परंतु प्रत्यक्षात जुजबीच पोलिस होते. विशाळगडावर तोडफोड होईल म्हणून सगळे पोलिस तिकडे गेले आणि जमावाच्या हल्ल्याचे आम्ही बळी ठरलो, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.
शाहू छत्रपतींनी काढून दिले जॅकेट..
हल्ला झालेल्या प्रत्येक घरात अगदी चुलीपर्यंत जाऊन शाहू छत्रपती, सतेज पाटील यांनी पाहणी केली. पाऊस कोसळत होता, परंतु त्यातूनच ते लोकांच्या भावनांना फुंकर घालत होते. एका कुटुंबात थंडीने गारठलेली चिमुकली पाहून शाहू छत्रपती यांचे मन गहिवरलं.. त्यांनी आपल्या अंगातील राकट रंगाचे जॅकेट चटकन काढले आणि तिला घातले..मायेची ऊब देऊन ते पुढे गेले..