विशाळगड जाळपोळ प्रकरण: शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या, खासदार महाडिकांची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी
By विश्वास पाटील | Updated: July 19, 2024 16:19 IST2024-07-19T16:18:08+5:302024-07-19T16:19:36+5:30
संभाजीराजेंसह ५०० जणांवर गुन्हे

विशाळगड जाळपोळ प्रकरण: शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या, खासदार महाडिकांची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी
कोल्हापूर: विशाळगडावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी झालेल्या आंदोलनाला (दि.14) रोजी हिंसक वळण लागले. याप्रकरणी काही तरुण शिवभक्तांवर पोलिस यंत्रणेने गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक शांतता राखण्यासाठी आणि त्या तरुणांचे भवितव्य लक्षात घेऊन, राज्य शासनाने संबंधित शिवभक्त तरुणांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशा मागणीचे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
या मागणीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संपूर्ण घटनेची पूर्ण माहिती घेऊन, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन गृहमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यामुळे शिवभक्त कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
विशाळगड जाळपोळप्रकरणी संभाजीराजेंसह ५०० जणांवर गुन्हे
गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये मुस्लीम समाजाच्या घरांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी सोमवारी २१ जणांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर संपूर्ण घटनेला जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संभाजीराजे, पुण्यातील रवींद्र पडवळ यांच्यासह ५०० हून अधिक जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या घटनेत सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.