विशाळगड कात टाकतोय बुरुज, कमानींची उभारणी : शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:32 PM2018-12-17T23:32:45+5:302018-12-17T23:53:59+5:30
स्वराज्यातील जाज्वल्य इतिहास आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले विशाळगडावरील शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी होत आहे. शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपये बुरुजांच्या व दक्षिण कमानीच्या उभारणीसाठी उपलब्ध आहेत. गडाच्या प्रथमदर्शनीच्या बुरुजांची काळाच्या ओघात पडझड
आंबा : स्वराज्यातील जाज्वल्य इतिहास आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले विशाळगडावरील शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी होत आहे. शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपये बुरुजांच्या व दक्षिण कमानीच्या उभारणीसाठी उपलब्ध आहेत. गडाच्या प्रथमदर्शनीच्या बुरुजांची काळाच्या ओघात पडझड झाली होती. बुरुजांचे घडीव दगड कोसळत होते. पावसाळ्यात बुरुजाखालून जाणे जीवघेणे ठरले होते.
कमानीही निखळल्या होत्या. त्यामुळे गडाचा तोंडावळा गायब झाला होता. सध्या या बुरुजांची बांधणी अंतिम टप्प्यात आल्याने गडाचा बाज साकारला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रथमदर्शनीचा मुंडा दरवाजा व त्याला सलग्न असलेले दोन बुरूज बांधले गेले. शेजारी बेवारस अवस्थेत पडलेल्या तोफेला चौथरा करून ती सुरक्षित ठेवली आहे. यामुळे रणमंडळ टेकडीचा बाज बहरला आहे. गडावर जाणाऱ्या अरुंद सिडीच्या रस्त्याला पर्याय म्हणून उजव्या बाजूने पायºयांचा रुंद रस्ता, खंदकावरील सिमेंटचा पूल, भगवंतेश्वर मंदिराकडे जाणाºया मार्गाची दुरुस्ती झाली. गडावरील भगवंतेशवर मंदिरासह राममंदिर, भावकाई मंदिर, गणेश मंदिर, मलिक रेहान बाबांचा दर्गा यांचा जीर्णोद्धार झाला. अमृतेश्वर मंदिरासमोरील पाण्याचे टाके पुनर्जीवित केले. बाजीप्रभू व फुलाजींची समाधिस्थळे सुशोभित केली आहेत.
दर्गा कमानी व भगवा चौक बहरला. यातून ऐतिहासिक वास्तूचे वैभव खुलले आहे. गड आणि पायथ्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बाजीप्रभू जलाशयातून (गजापूर) वाढीव पाणीपुरवठा योजनेला ग्रामपंचायतीने मंजुरी आणली आहे. त्याला निधी मिळून ती तातडीने होण्याची गरज आहे. अनेक दशके केंबुर्णेवाडी ते विशाळगड हा रस्ता निधीअभावी धुळीत होता. गेल्या वर्षी रस्ता डांबरीकरण होऊन पावनखिंडीकडून येणारा रस्ता व घाट यांचे दीड वर्षात बांधकाम गतिमान झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुरावलेला पर्यटक पुन्हा इकडे वळू लागला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून विशाळगडसह पावनखिंडीच्या विकासाला शासकीय निधी मिळू लागल्याने गडाचे व खिंडीचे अस्तित्व पुन्हा नजरेत भरू लागले आहे. पावनखिंडीतही पार्किंगसह नरवीर बाजीप्रभंूच्या पराक्रमांची साक्ष देणारे स्मारक, खिंडीत उतरण्यास दगडी पायºया, तसेच सुरक्षिततेसाठी कठडे उभारले आहेत. खिंडीकडे वळणाºया रस्त्यावरच दगडी निशाण चबुतरा, अर्धगोलाकार स्वागत कठडे उभारल्याने पावनखिंडीकडे
पर्यटकांचे पाय वळत आहेत. येथे सर्वत्र पाण्याचे झरे आहेत. पाऊसही मोठा होतो. या परिसरात बंधाºयाचे बांधकाम करण्यासाठी सर्वेक्षण झाले आहे. वृक्षलागवड, जलाशय, बगीचा, पदभ्रमंतीतील धारकºयांना निवास व्यवस्था, सभागृह व स्वच्छतागृह यांच्या बांधकामाचेही प्रस्ताव झाले आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेनुसार राबलेले ‘आडवाटेवरचे पर्यटन’ यामध्ये पांढरेपाणी व पावनखिंड यांचा समावेश केला आहे. आता येथील प्रलंबित प्रस्तावांना निधी देण्याचे पालकत्व सांभाळावे, असा येथील भूमिपुत्रांचा आग्रह आहे.
राजवाडा अर्धवटच...
गडावरील भगवंतेश्वर मंदिरामागील पंतप्रतिनिधीचा राजवाडा हे गडाचे वैभव होते. हा वाडा भुईसपाट झाला होता. त्याला लागूनच पाण्याचा हौद व चंद्रकोर विहीर ही शिवकालीन पाण्याचे मोठे स्रोत आहेत; पण याकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. राजवाडा पूर्ण झाला तर येथील हे पाणीस्रोत जपले जातील. प्राचीन बांधकामाचे हे दोन स्रोत ठेवाच आहे. मुंढा दरवाजाच्या बांधकामाबरोबर राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले. चौथरे उभारले गेले; पण पुन्हा या बांधकामाला ‘खो’ बसला. या बांधकामास निधी मिळावा, अशी मागणी शिवाजी तरुण मंडळ व विशाळगडवासीयांनी केली आहे.