विशाळगड हिंसाचार: घाबरू नका, शासन पाठीशी; पालकमंत्री हसन मुश्रीफांनी पीडित ग्रामस्थांना दिला आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 01:18 PM2024-07-20T13:18:57+5:302024-07-20T13:19:28+5:30
लवकरच नुकसानभरपाई देऊ, गजापूरमधील हिंसाचाराची राज्यस्तरीय चौकशी होणार
आंबा : गजापूर (ता. शाहूवाडी) येथील हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शासनाकडून देण्यात आलेल्या मदतीचा त्यांनी आढावा घेतला. पीडित ग्रामस्थांशी संवाद साधून घाबरू नका, आपआपल्या कुटुंबीयांना सावरा, शासन तुमच्या पाठीशी आहे. हिंसाचाराची राज्यस्तरीय चौकशी होणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गजापूरमधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य आहे. दुर्दैवी घटनेनंतर गावातील नागरिक घाबरून गेले आहेत, त्यांना धीर देणे त्यांना आवश्यक मदत देऊन त्यांचे जीवनमान सुस्थितीत कसे येईल याचे नियोजन प्राधान्याने केले जात आहे. या घटनेची राज्यस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
गजापूरमध्ये कायमस्वरूपी पोलिस चौकी
गजापूरमध्ये विशाळगडसारखी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारली जाईल. याबाबतचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
अतिक्रमणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणार
विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत दिलेल्या आदेशाचा अभ्यास करून २९ जुलैला होणाऱ्या सुनावणीदरम्यान प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी या वेळी सांगितले.
२.८५ कोटी नुकसानभरपाईचा प्रस्ताव
गजापूरमध्ये तातडीची मदत म्हणून राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. नुकसानीचे पंचनामे केले असून यामध्ये २ कोटी ८५ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर केल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.