Kolhapur: विशाळगड मुक्ती मोहीमेची तारीख बदलली, १३ जुलै ऐवजी आता..
By भारत चव्हाण | Published: July 9, 2024 07:37 PM2024-07-09T19:37:06+5:302024-07-09T19:39:04+5:30
संभाजीराजे यांची माहिती
कोल्हापूर : शिवभक्तांच्या आग्रहाखातर दि. १३ ऐवजी दि. १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती मोहीम आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.
संभाजीराजे छ्त्रपती गेल्या दीड वर्षांपासून किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर लढा देत आहेत. मात्र या दीड वर्षांत प्रशासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने संभाजीराजे यांनी दि. ०७ जुलै रोजी कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमण मुक्तीबाबत पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात शिवभक्तांची बैठक बोलवली होती.
१३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाचा वेढा भेदून विशाळगडावर पोहचले होते. त्यामुळे याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून १३ जुलै २०२४ रोजी हजारो शिवभक्तांसह किल्ले विशाळगडावर जाऊन अतिक्रमण हटविण्याचा निर्धार केला होता. या मोहिमेस असंख्य शिवभक्तांचा प्रतिसाद लाभत असून शनिवार ऐवजी रविवारी ही मोहीम आयोजित करावी, अशी मागणी राज्यभरातील अनेक शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.
शिवभक्तांच्या या मागणीचा विचार करून संभाजीराजे यांनी १३ जुलै ऐवजी रविवार, दि. १४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले आहे.