समीर देसाईकडून विष्णू खोसे चितपट- : काळाइमाम तालीम ट्रस्टचे कुस्ती मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:22 AM2019-05-18T00:22:43+5:302019-05-18T00:23:21+5:30
कोल्हापूर : काळाइमाम तालीम पैलवान व ट्रस्टच्या वतीने आयोजित कुस्ती मैदानात डाव-प्रतिडावांनी रंगलेल्या पहिल्या क्रमांकाच्या लढतीत गारगोटीच्या समीर देसाई ...
कोल्हापूर : काळाइमाम तालीम पैलवान व ट्रस्टच्या वतीने आयोजित कुस्ती मैदानात डाव-प्रतिडावांनी रंगलेल्या पहिल्या क्रमांकाच्या लढतीत गारगोटीच्या समीर देसाई याने पुण्याच्या विष्णू खोसे याला एकचाक डावावर शुक्रवारी चितपट केले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तिसºया क्रमांकाच्या लढतीत अहमदनगरच्या रवींद्र शेडगे याने मोतीबाग तालमीच्या उदयराज पाटील याच्यावर आखडी डावाने मात केली.
या ट्रस्टतर्फे पैलवान लक्ष्मण वडार आणि कृष्णा कळंत्रे यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी खासबाग मैदान येथे कुस्ती मैदान घेण्यात आले. आखाडा पूजनानंतर दुपारी चार वाजता कुस्त्यांना सुरुवात झाली. यावेळी नंदकुमार मोरे, महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडाधिकारी बाजीराव कळंत्रे, उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, प्रकाश चौगले, संभाजी पाटील, मारुती ढेरे, काळाइमाम ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष सांगवडेकर, आदी उपस्थित होते. दर्दी कुस्तीशौकिनांच्या उपस्थितीत रात्री सव्वाआठ वाजता पहिल्या क्रमांकासाठी गारगोटीच्या अमोल बुचडे कुस्तीसंकुलाचा पैलवान समीर देसाई आणि पुणे सह्याद्री आखाड्याचा पैलवान विष्णू खोसे यांच्यात लढत सुरू झाली. प्रारंभी दोन्ही मल्लांनी एकमेकांची गर्दनखेच करीत ताकद आजमाविली. त्यात विष्णू याने लागोपाठ दोन वेळा एकेरी पट काढत समीरचा ताबा घेतला. त्यातून समीर निसटला. या दोघांकडून एकमेकांचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात कुस्ती मैदानाबाहेर गेली.
पुन्हा खडाखडी सुरू झाली. समीरने एकचाक मारण्याचा केलेला प्रयत्न विष्णूने धुडकावून लावला. त्यावर आक्रमकपणे चढाई करीत समीरने एकचाक डावावर विष्णूला चितपट केले. डाव-प्रतिडावांनी रंगलेल्या सहा मिनिटांच्या कुस्तीने शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दुसºया क्रमांकासाठी मोतीबाग तालमीचा पैलवान संतोष लव्हटे आणि महाराष्ट्र पोलीसचा पैलवान विक्रम वडतिले एकमेकांना भिडले. २० मिनिटांहून अधिक वेळ चाललेली कुस्ती अखेर बरोबरीत सोडविण्यात आली. शाहू कुस्ती केंद्राचा सरदार सावंत आणि महाराष्ट्र पोलीसचा शंकर बंडगर यांच्यातील चौथ्या क्रमांकाची कुस्ती २० मिनिटे चालली. त्यात सरदार याने घिस्सा डावावर शंकर याला पराभूत केले. पाचव्या क्रमांकाच्या लढतीत अभिजित भोसले याने सतीश अडसूळ याच्यावर, तर सहाव्या क्रमांकाच्या लढतीमध्ये न्यू मोतीबाग तालीमचा अनिल चव्हाण याने मुरगूडच्या रोहन रंडे याला गुणांवर हरविले. विजेता पैलवान समीर याला उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाजीराव कळंत्रे, संभाजीराव पाटील, अॅड. मुनाफ मणेर, बाजीराव पाटील, संग्राम कळंत्रे, संचित वडार, आदी उपस्थित होते. मारुती जाधव (बटू) यांनी निवेदन केले.
प्रेक्षणीय, चटकदार कुस्त्या
या मैदानात प्रेक्षणीय आणि चटकदार कुस्त्या रंगल्या. त्यामध्ये अजित पाटील, पृथ्वीराज पाटील, समाधान खताळ, युवराज जाधव, बाबा रानगे, कृष्णात कांबळे, चैतन्य लिमन, माणिक कारंडे, विनायक गुरव, पार्थ चौगले, इंद्रजित चौगले, आविष्कार खोत, समर्थ खोत, संस्कार गोसावी, सोपान पाटील, सोन्या राऊत, तुषार जाधव, संदीप बिराजदार, ओंकार लाड, साहील चौगले, सौरभ पाटील, मयूर चौगले, शुभम चौगले, आदित्य वरिंगकर, सोहम पाटील, आदी विजयी झाले.
मान्यवरांची उपस्थिती
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रीडाधिकारी बालाजी बरबडे, बिद्री कारखान्याचे किसनराव मोरे, महाराष्ट्र चॅम्पियन महिपती केसरे, संपत पाटील, नामदेव मोळे, वस्ताद रंगा कळंत्रे, ज्येष्ठ मल्ल अशोक पाटील, हणमंत जाधव, संभाजी किसरूळकर, शामराव खडके, पांडुरंग पाटील, बाबा महाडिक, बंकट थोडगे, आदींनी मैदानाला उपस्थिती लावली.
क्षणचित्रे
काळाइमाम तालमीच्या मल्लांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच कुस्ती मैदान भरविले.
पैलवान संभाजी टिपकुर्लीकर यांनी डोक्याने फोडला नारळ
महिला मल्ल माधुरी घराळ हिचा सत्कार
सौंदलगा येथील श्रीधर आणि विठ्ठल आयवळे, आकाश कांबळे, संतोष घाटगे, सूरज माने यांनी हलगी-कैताळाने मैदान दणाणून सोडले.