विद्यापीठ सेवक संघाचे साखळी उपोषण स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:49 AM2020-01-09T10:49:01+5:302020-01-09T10:50:17+5:30
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने विद्यापीठ सेवक संघाने साखळी उपोषण बुधवारी स्थगित केले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने विद्यापीठ सेवक संघाने साखळी उपोषण बुधवारी स्थगित केले.
सेवक संघाच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आणि त्याच्या सोडवणुकीसाठी गेली दोन वर्षे प्रशासकीय पातळीवर विनंती पत्रे, तसेच अनेक वेळा समक्ष चर्चा झाली आहे. तथापि याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद दिसून येत नसल्याने प्रशासन मागण्यांच्या संदर्भात वेळकाढूपणाचे धोरण घेत असल्याच्या भावनेतून कर्मचाऱ्यांनी दि. १ जानेवारीपासून मुख्य इमारतीच्या पाणपोईजवळ साखळी उपोषण सुरू केले.
प्रशासनाशी मंगळवारी झालेल्या चर्चेनंतरआणि सेवक संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर गेले सात दिवस चाललेले साखळी उपोषण या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता सर्व सभासदांची बैठक घेण्यात आली. त्यात अध्यक्ष बाबा सावंत यांनी प्रशासनाशी झालेल्या चर्चेच्या मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवृतांत आणि सेवक संघाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी प्रशासनाच्यावतीने कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून सेवक संघाच्या सर्व सभासदांसमोर मागण्यांची पूर्तता करीत असल्याबाबत स्पष्टता केली. सध्या सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्याबाबत प्रशासनाच्यावतीने आव्हान केले. यावेळी बाबा सावंत यांनी प्रशासनाचे आभार मानून बहुतांशी मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असल्याने सुरू असलेले आंदोलन बुधवारपासून स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. देशव्यापी संपास महाराष्ट्र विद्यापीठ महासंघाच्या सूचनेनुसार पाठिंबा जाहीर केला.