विष्णुपंतांच्या शिवबंधनाने ताराराणी ‘गोत्यात’
By admin | Published: February 4, 2017 12:38 AM2017-02-04T00:38:03+5:302017-02-04T00:38:03+5:30
आजऱ्यातील राजकारण : श्रीपतरावही नाराजी व्यक्त करून ताराराणीपासून दूर; अशोकअण्णांची कसोटी
ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा साखर कारखाना निवडणुकीत ‘महाआघाडी’च्या माध्यमातून एकत्रितपणे राष्ट्रीय-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीविरोधात निवडणुकीला सामोरे गेलेल्या अण्णा-भाऊ गट, भाजप-शिवसेना, श्रीपतराव देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी निवडणुकीत निसटते का असेना बहुमत मिळविले. परंतु, केवळ आठच महिन्याच होत असलेल्या जि. प. निवडणुकीत बहुतांश मंडळींनी महाआघाडीचे ‘ताराराणी आघाडी’ असे नामकरण झाल्यानंतर या आघाडीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान सभापती विष्णूपंत केसरकर यांनी थेट सेनेत प्रवेश करून अनेक राजकीय खेळ्या साध्य केल्या आहेत. श्रीपतराव थेट नाराजी व्यक्त करून अद्याप तरी ताराराणीपासून दूर आहेत. त्यामुळे ताराराणी समोरील अडचणी वाढतच असून, या सर्व प्रकारात अशोकअण्णांची कसोटी लागली आहे.
साखर कारखान्यातील महाआघाडीअंतर्गत असणारा संघर्ष या निवडणुकीच्या माध्यमातून उफाळून आला आहे. ‘महाआघाडी’ होती ते बर होतं अशी प्रतिक्रिया या आघाडीचे ताराराणीत रूपांतर झाल्यानंतर महाआघाडीच्या पाठीशी असणारी अनेक मंडळी देत आहेत. कारखाना निवडणुकीतील यशानंतर जि. प. व पं. स. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत गेली.
ही वाढलेली संख्या प्राधान्याने अशोकअण्णांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली. एक-दोन संचालकांच्या अपवाद वगळता सर्वच सत्तारूढ संचालक जि.प. व पं.स. निवडणुकीकरिता रेटा लाऊ लागले. यातून मान-अपमानाचे नाट्य सुरू झाले आणि कारखाना कारभाराबाबत चर्चा सुरू झाली.
विष्णुपंत शिवसेनेत गेल्यामुळे आमदार प्रकाश आबीटकर यांना शिवसेना उमेदवारांचाच प्रचार करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. प्रा. सुनील शिंत्रे, श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या प्रचारात थेट उतरू शकत नाहीत. आता भाजपला किमान पं. स. करिता ताराराणीतून संधी दिल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना हाताळताना मोठ्या अडचणींची शक्यता आहे.
पेरणोली पं. स. मतदारसंघात ‘ताराराणी’कडून उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होणे याचा साधा अर्थ नाराजांना शांत करूनच निर्णय जाहीर करणे असाच आहे. शिवसेनेकडून ठिकठिकाणी उमेदवार उभे करून काँगे्रस-राष्ट्रवादीपेक्षा ‘ताराराणी’ला अडचणीत आणण्याची व्यूहरचना सुरू आहे. भाजपचे उमेदवारच रिंगणात नसल्याने भाजपचा आक्षेपाचा प्रश्न नाही आणि आता भाजपशी काडीमोड झालाच आहे. ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्तेही सोयीची भूमिका घेत आहेत.
साखर कारखाना निवडणुकीत सुरक्षित असणारी महाआघाडी ‘ताराराणी’त रूपांतर झाल्यानंतर ‘खडतर’ प्रवासाची बनू लागली आहे. महाआघाडी तालुक्यापुरती मर्यादित होती. ‘ताराराणी’ जिल्ह्यामध्ये सक्रीय असल्याने या आघाडीवर अनेक मर्यादा येऊ लागल्याचे दिसते. ताराराणी विरोधातील जिल्ह्यतील नेत्यांची रसद आता ‘ताराराणी’ विरोधातील सक्षम उमेदवारांना मिळणार हे सुद्धा स्पष्ट आहे.
केसरकर, शिवसेना, श्रीपतराव यांच्या भूमिकेने अशोकअण्णा व रवींद्र आपटेंच्या खांद्यावरील ओझे वाढतच चालले आहे. रवींद्र आपटेंनी उत्तूर भागात उमेश आपटेंविरोधात जोरदार फिल्डींग लावली आहे.
मतदानापर्यंत तेथून ‘लक्ष’ काढणे त्यांना अडचणीचे आहे. राहिले अशोकअण्णा. अण्णांनी आजरा जि.प. मतदारसंघ सांभाळायचा की इतरत्र लक्ष घालायचे? हेदेखील विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे ‘ताराराणी’चा भार आता अशोकअण्णांनाच पेलावा लागणार हे निश्चित.
राष्ट्रवादीचे दुखणे
राष्ट्रवादी काँगे्रस जि. प. करिता उमेदवारी न घेता श्रीमती अंजना रेडेकर यांच्या पाठीशी रहावी यासाठी राष्ट्रवादीतील एक गट प्रयत्नशील आहे.
तर कोणत्याही परिस्थितीत आपण उमेदवारी करणारच असा निर्णय राष्ट्रवादीच्या विद्यमान जि. प. सदस्य संजीवनी गुरव यांनी जाहीर करून ‘अपक्ष’ लढण्याची तयारी सुरू केली आहे.