विश्व हिंदू परिषदेतर्फे कोल्हापूरात निदर्शने
By Admin | Published: May 31, 2017 02:36 PM2017-05-31T14:36:17+5:302017-05-31T14:36:17+5:30
गोहत्येचा निषेध : गुन्हा दाखल करण्याची मागणी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ३१ : युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांने केरळ येथे भर चौकात गोहत्या केल्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. कॉंग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संबधित युवक कार्यकर्त्याला फाशी देण्याची मागणी यावेळी केली.
केंद्र सरकारने प्राणी क्रुरता कायद्यात बदल करून गोहत्या करण्यावर बंदी घातली आहे. त्याविरोधात केरळ युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भर चौकात गोहत्या करून दंगल घडविण्याचा प्रयत्न केला आहे. शंभर कोटी हिंदू समाजाच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचे काम या माथेफिरूने केल्याचे विश्व हिंदू परिषदेचे शहर प्रमुख महेश उरसाल यांनी सांगितले.
केरळच्या कोलम जिल्ह्यातील वरिष्ठ कॉँग्रेस नेते बिंदू कृष्णा यांनी तर पंतप्रधानांना गोमासापासून बनविलेले पदार्थ पार्सल पाठविण्याचे वक्तव्य करून देशाला आव्हान दिले आहे. बिंदू कृष्णा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी परिषदेचे जिल्हा मंत्री श्रीकांत पोतनीस यांनी केली. केरळ मधील या घटनेचा जाहीर निषेध करत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात जोरदार निदर्शने केली.
कॉँग्रेस सरकार व गोहत्या करणाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा प्रमुख संभाजी साळुंखे, अशोक रामचंदानी, राजेंद्र सुर्यवंशी, शिवसेनेचे शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, शशिकांत बीडकर, सचिन मांगुरे, अजिंक्य पाटील, किरण दुसे, राजू यादव, मधूकर नाझरे आदी उपस्थित होते.