सहावीतील विश्वजित चव्हाण ठरला ‘नॅशनल चॅम्पियन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:46 PM2019-02-06T18:46:39+5:302019-02-06T18:48:22+5:30
अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा सहावीमध्ये शिकत असणारा विद्यार्थी विश्वजित विशाल चव्हाण हा टीसीसीआयओएन (टाटा समूह)-इंटिलिजिएम आयोजित बुद्धिमान कोण, या स्पर्धेचा नॅशनल चॅम्पियन ठरला. या स्पर्धेचे बक्षीस म्हणून त्याला ५० हजार रुपये स्कॉलरशिप, प्रमाणपत्र, शिल्ड, पुस्तके, पेन, अॅमेझॉन इको या वस्तू प्राप्त झाल्या.
कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा सहावीमध्ये शिकत असणारा विद्यार्थी विश्वजित विशाल चव्हाण हा टीसीसीआयओएन (टाटा समूह)-इंटिलिजिएम आयोजित बुद्धिमान कोण, या स्पर्धेचा नॅशनल चॅम्पियन ठरला. या स्पर्धेचे बक्षीस म्हणून त्याला ५० हजार रुपये स्कॉलरशिप, प्रमाणपत्र, शिल्ड, पुस्तके, पेन, अॅमेझॉन इको या वस्तू प्राप्त झाल्या.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा विकास व्हावा, वाचनाची आवड निर्माण व्हावी व स्मरणशक्ती वाढावी या उद्देशाने भारतात आयोजित करण्यात आली होती. विश्वजित हा मूळचा येथील राजोपाध्येनगरातील आहे परंतू नोकरीच्या निमित्ताने त्याचे कुटुंब सध्या इचलकरंजीत राहते. त्याचे वडील इचलकरंजीतील लूम मॅनेजमेंटमधील मल्टिनॅशनल कंपनीत वरिष्ठ अधिकारी, तर आई स्वाती या ‘डीकेटीई’मध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत.
ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये पार पडली. प्राथमिक फेरीत लेखी परीक्षा, द्वितीय फेरीत आॅनलाईन परीक्षा व अंतिम फेरी ठाणे या ठिकाणी भाषण व कविता सादरीकरण या स्वरूपात पार पडली. चार कॅटेगिरीमधून देशभरातून प्रत्येकी १0 मुलांची निवड करण्यात आली होती. मुंबईत २५ व २६ जानेवारीला अंतिम फेरी झाली.
या स्पर्धेला जाण्यासाठी त्याला बेळगाव ते मुंबई विमान प्रवासाची सुविधा देण्यात आली. या सर्व फेरीतून विश्वजित याची ज्युनिअर विभागात नॅशनल चॅम्पियन म्हणून निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी विश्वजितचे अभिनंदन केले. त्यास अनिर्बन चटर्जी व अर्जुन रॉय यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे आजोबा वसंतराव चव्हाण व आजी विजया या देखील निवृत्त मुख्याद्यापक आहेत.
जे करेल त्यात सर्वोत्तम
विश्वजितला वाचनाची प्रचंड आवड आहे. त्याशिवाय तो खेळात व अभ्यासातही तितकाच पुढे आहे. जे काही करायचे त्यात सर्वांत पुढेच असले पाहिजे, अशी त्याची आतापर्यंतची वाटचाल आहे. त्यामुळे त्याचा आम्हांला अभिमान वाटतो अशी भावना आई स्वाती यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.