देवस्थान समिती अध्यक्षपदी विश्वविजय खानविलकर ?

By admin | Published: November 10, 2015 11:33 PM2015-11-10T23:33:15+5:302015-11-10T23:33:15+5:30

दिवाळीनंतर घोषणा : खानविलकर गटाला उभारी देण्याचा प्रयत्न

Vishwajjay Khanvilkar as Chairman of Devasthan Committee? | देवस्थान समिती अध्यक्षपदी विश्वविजय खानविलकर ?

देवस्थान समिती अध्यक्षपदी विश्वविजय खानविलकर ?

Next

राजाराम लोंढे --कोल्हापूर -पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी युवा नेते विश्वविजय दिग्विजय खानविलकर यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला असून, या माध्यमातून खानविलकर गटाला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. त्याच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्र्याचा दर्जा असल्याने या पदासाठी नेहमीच चढाओढ असते. यापूर्वी कॉँग्रेसचे
अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांनी अध्यक्ष म्हणून काम केले होते; पण अ‍ॅड. घोरपडे यांची मुदत जून २०१० मध्ये संपली आहे. तेव्हापासून दोन वर्षे हे पद रिक्त होते. त्यानंतर गेली तीन वर्षे जिल्हाधिकाऱ्यांकडे या अध्यक्षपदाचा कार्यभार आहे. आघाडी सरकारच्या कालावधीत अध्यक्षपदासाठी
अ‍ॅड. सुरेश कुराडे, संजय डी. पाटील, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांनी प्रयत्न सुरू केले होते. विधानसभा निवडणुकीवेळी अ‍ॅड. कुराडे व संजय पाटील यांच्या नावांवर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जोरदार प्रयत्न झाले; पण अध्यक्षपदाचा तिढा सुटेपर्यंत निवडणूक लागली. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देवस्थान समिती भाजपकडे आली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू होती; पण त्यांनी यासाठी नकार दिल्यानंतर इतरांनी मोर्चेबांधणी लावली.
आमदार मुश्रीफ यांना शह देण्यासाठी दिवंगत नेते, माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांना अध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू होत्या; पण त्यांच्या निधनामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर घाटगे यांचे सुपुत्र समरजितसिंह घाटगे, अ‍ॅड. संपतराव पवार व विश्वविजय खानविलकर यांच्या नावांची चर्चा सुरू झाली. ‘शाहू’ समूहाचा व्याप पाहता ही जबाबदारी आपणाला शक्य होणार नाही, असे घाटगे यांनी सांगितल्यानंतर खानविलकर यांचे नाव पुढे आले. खानविलकर यांनी विधानसभा,महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार केला आहे. तसेच स्व. दिग्विजय खानविलकर व नितीन गडकरी यांचे मैत्रीचे सबंध सर्वश्रुत होते. गडकरी यांच्यामुळेच विश्वविजय हे भाजपमध्ये आले आहेत.


कायद्याची पदवी अभिप्रेत
देवस्थान समितीचे आतापर्यंतचे अध्यक्ष हे कायद्याची पदवी घेतलेलेच झालेत. हा विभाग विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत येतो. त्याचबरोबर देवस्थानच्या ३२ हजार हेक्टर जमिनी आहेत, त्यामध्ये कायदेशीर गुंतागुंती आहेत. त्यामुळे येथे कायद्याचे ज्ञान असणारा अध्यक्ष असावा, असे संकेत आहेत. या पदावरील व्यक्ती वकीलच असावी असे नाही.

खजिनदारपदही रिक्त
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सदस्यपदाच्या रिक्त जागांवर संगीता खाडे व बी. एन. पाटील-मुगळीकर यांची वर्णी लागली; पण अध्यक्षपदाबरोबर खजिनदारपदही रिक्त राहिले. आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब कुपेकर खजानीस होते. या ठिकाणी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली जाऊ शकते.

Web Title: Vishwajjay Khanvilkar as Chairman of Devasthan Committee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.