Kolhapur: बनावट नोटा प्रकरणातील विश्वनाथ जोशी याला नृसिंहवाडीत अटक, पाच वर्षापासून होता फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:48 PM2024-11-07T18:48:20+5:302024-11-07T18:51:07+5:30
रमेश सुतार गणेशवाडी : बनावट नोटा प्रकरणातील पाच वर्षापासून फरार असणाऱ्या मुख्य आरोपी विश्वनाथ सुहास जोशी (वय ४४) याला ...
रमेश सुतार
गणेशवाडी : बनावट नोटा प्रकरणातील पाच वर्षापासून फरार असणाऱ्या मुख्य आरोपी विश्वनाथ सुहास जोशी (वय ४४) याला नृसिंहवाडीतून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. जोशी हा मूळचा तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावचा रहिवासी असून २०१९ पासून तो फरारी होता.
याबाबत माहिती अशी की, गांधीनगरमध्ये २० जानेवारी २०१९ मध्ये उचगाव येथील अभिजीत राजेंद्र पवार याला बनावट नोटाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी ७ हजार ५५० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या.
पोलिस तपासात विश्वनाथ सुहास जोशी आणि प्रवीण अजित कुमार उपाध्ये यांनी सांगली येथे नोटा तयार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शामराव नगर मधील एका बंगल्यात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करण्याचा कारखान्यांवर छापा टाकला. यामध्ये स्कॅनर, प्रिंटरही जप्त करण्यात आला.
यावेळी अभिजीत राजेंद्र पवार आणि प्रवीण अजित कुमार उपाध्ये यांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी विश्वनाथ सुहास जोशी हा फरार होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनय झिंजुर्के करीत आहेत.