विश्वास पाटील यांनी दिले संचालकांना योगाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:59+5:302021-06-22T04:16:59+5:30
कोल्हापूर : कामाचा व्याप, पैशामागची धडपड किंवा यश, कीर्ती, अर्थप्राप्ती आदीमध्ये आरोग्य रक्षण होऊनही दीर्घायुष्य हा भाग चिंतनीय ...
कोल्हापूर : कामाचा व्याप, पैशामागची धडपड किंवा यश, कीर्ती, अर्थप्राप्ती आदीमध्ये आरोग्य रक्षण होऊनही दीर्घायुष्य हा भाग चिंतनीय आहे. सध्याच्या युगात माणसाकडे पैसा, सत्ता, मान असूनही आरोग्य किंवा सुखाची प्राप्ती ही दुरापास्त वाटणारी गोष्ट झालेली आहे. योग हा सध्याच्या धावपळीच्या जगात एकमेव उपाय असल्याचे प्रतिपादन ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात आयोजित केलेल्या योग शिबिराप्रसंगी ते बोलत होते. कर्मचाऱ्यांना अध्यक्ष पाटील यांनी योगाची प्रात्यक्षिके दाखवली. सर्वांगासन, पादान्गुष्टासन, शशकासन, मंडूकासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, विपरीतनौकासन, पर्वतासन, ताडासन आदी आसने त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर सादर करुन ती योगासने कर्मचाऱ्यांकडून करवून घेतली आणि ही आसने नित्यनियमाने गोकुळ परिवारातील सर्व घटकानी करावीत असे आवाहनही त्यांनी केले. स्वतःच्या शरीर तंदुरुस्तीचे गमक सांगताना पाटील यांनी आपण आपला दैनंदिन कामाचा व्याप सांभाळून दररोज ४० मिनिटे योगासने व ५० मिनिटे चालण्याचा व्यायाम करत असल्याचे सांगितले.
संचालक अजित नरके, बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, चेतन नरके, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवली.
संचालक नंदकुमार ढेंगे, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंबरीश घाटगे, बोर्ड सचिव एस. एम. पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संचालकांसह कर्मचाऱ्यांना योगाचे धडे दिले. यावेळी एस. आर. पाटील, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंबरीश घाटगे, बाबासाहेब चौगले आदी उपस्थित होते. (फोटो-२१०६२०२१-कोल-गोकुळ)