दूरदृष्टी, हिंमत आणि धाडस म्हणजे मोदी, माजी मंत्री प्रकाश जावडेकरांचे गौरवोद्वार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:59 PM2022-11-29T17:59:49+5:302022-11-29T18:01:18+5:30
विलक्षण दृरदृष्टी असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा चेहरामोहरा बदलला.
कोल्हापूर : दूरदृष्टीने निर्णय घेण्याची हिंमत आणि तो निर्णय अंमलात आणण्याचे धाडस म्हणजे नरेंद्र मोदी होय, अशा शब्दात माजी मंत्री व खासदार प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा सोमवारी येथे गौरव केला.
ब्राह्मण सभा करवीर आणि महालक्ष्मी बॅंकेच्यावतीने आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘मोदी@२१’ या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, विलक्षण दृरदृष्टी असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा चेहरामोहरा बदलला. जगभरात भारताचा दबदबा वाढला. ब्रिटनलाही मागे टाकून भारत महासत्ता बनण्यासाठी पुढे निघाला आहे. ३०० रुपयांचे एलईडी बल्ब आता ७० रुपयांना मिळू लागले. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेन्सचीही किंमत कमी झाली. काशी, महाकाल, केदारनाथचा विकास झाला आणि १ जानेवारी २०२४ ला भव्य राममंदिरही सर्वांसाठी खुले होणार आहे.
ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक तीन लस बनवणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला. कोट्यवधी शौचालये, सर्वसामान्यांना पदम पुरस्कार, १० हजार माध्यमिक शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब अशा शेकडो योजनांच्या माध्यमातून मोदींनी बदल घडवून आणला. पूर्वी विदेशातील पाहुण्यांना ताजमहालची प्रतिकृती भेट दिली जायची. तिथे आता गावखेड्यातील कलाकाराची कलाकृती भेट दिली जाते.
महाडिक म्हणाले, पूर्वी दिल्लीतून पाठवलेल्या एक रुपयांपैकी १५ पैसे गावपातळीवर यायचे. आता एका क्लिकवर दिल्लीतून पाठवलेला रुपयाच्या रुपया जनधन खात्याच्या माध्यमातून गावातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो हे नरेंद्र मोदी यांचे कर्तृत्व आहे. ॲड. विवेक शुक्ल यांनी स्वागत केले. विनोद डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. ॲड. राजेंद्र किंकर यांनी आभार मानले.